यवतमाळात सावलीचा दुष्काळ

By admin | Published: April 12, 2016 04:44 AM2016-04-12T04:44:41+5:302016-04-12T04:44:41+5:30

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो गावकरी दररोज यवतमाळ शहरात येतात. डोक्याला उपरणे गुंडाळून दिवसभर

Shadow drought in the present day | यवतमाळात सावलीचा दुष्काळ

यवतमाळात सावलीचा दुष्काळ

Next

अविनाश साबापुरे ल्ल यवतमाळ
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो गावकरी दररोज यवतमाळ शहरात येतात. डोक्याला उपरणे गुंडाळून दिवसभर उन्हातान्हात पायी फिरतात. सरकारी उंबरठे झिजवतात. कुणाचे काम होते, कुणाला रित्या हाताने गावाची वाट धरावी लागते. डोळे वटारून बघणाऱ्या सूर्याला त्यांची शेवटपर्यंत कीव येत नाही. ऊन अंगावर घेणाऱ्या ग्रामस्थांना शहरात शोधूनही सावली सापडत नाही. गावकऱ्यांसाठीच नव्हेतर, खुद्द शहरवासीयांसाठीदेखील सावलीचा हा दुष्काळ संताप आणणारा आहे.

आपके शहर मे आया
तो गाव से भी गया
इमारतो की भीड मे
पिपल की छाँव से भी गया..
आपके शहर का
ये चाल कैसा हैं?
किसीने ये भी न पुछा
के हाल कैसा हैं?
असा विषाद घेऊनच ग्रामीण माणूस यवतमाळातून परत जातो. डोंगर आणि वनराईसाठी जिल्ह्याचे नाव घेतले जाते. पण खुद्द जिल्ह्याच्या स्थळी सावलीचा मागमूस नाही. ग्रामीण माणसे बसस्थानकावर उतरताच सावली शोधतात. पण विसाव्याचे ठिकाण गवसत नाही. यवतमाळचा भौगोलिक विस्तार आडवा-उभा वाढत आहे. कळंब चौकापासून लोहारा चौकापर्यंतच्या पाच-सहा किलोमीटर परिसरात एकही डेरेदार वृक्ष नाही. शहराची सर्वाधिक रहदारी या मार्गावर आहे. पण सावलीच नसल्याने पांथस्थांना आणि दुचाकीस्वारांना जमेल तेवढ्या वेगाने या मार्गावरून निघून जाण्याची घाई होते. बसस्थानक चौक म्हणजे शहराचे हृदयस्थान. पण येथे झाडांचा आसरा अजिबात नाही. या चौकातून न्यायालयाकडे जाणाऱ्या मार्गावर किंचित वृक्षराजी आहे. पण ती चारचाकी वाहनांनी गटकावलेली असते. पादचाऱ्यांना थांबण्यास तिथे वाव नाही. बसस्थानक ते आर्णी मार्ग हा ३-४ किलोमीटरचा परिसरही सावलीविना ओकाबोकाच आहे. नाही म्हणायला, जिल्हा परिषदेच्या कम्पाऊंडजवळील अशोकाची झाडे तेवढी दिसतात. पण त्यांचा सावलीसाठी उपयोग नाही. वडगाव ग्रामपंचायतीजवळ पूर्वी पिंपळ वृक्ष होता. चार-पाच महिन्यांपूर्वी त्याला जमीनदोस्त करण्यात आले. आर्णी नाक्यावर अजून एक पिंपळ वृक्ष आहे. पण त्याच्या फांद्या छाटल्याने सावली त्याच्याच पायाशी संकोचून गेली आहे. नेताजी मार्केटपासून दत्तचौक ते दाते महाविद्यालयाच्या परिसरापर्यंत सावलीचे ठिकाण नाही. दाते महाविद्यालयाजवळ चार दोन झाडांनी माणसांवर माया पांघरलेली आहे. पण पुन्हा तेथून पुढचा परिसर रणरणत्या उन्हाच्याच हवाली. सिंघानिया नगरातील एक पिंपळवृक्षही अर्पाटमेंटच्या बांधकामासाठी छाटण्यात आला आहे. तहसीलपासून जाणारा ४-५ किलोमीटरचा गोदणी मार्गही नुसता होरपळत असतो. पंचायत समिती, शाळा, महाविद्यालय, पंतसंस्था अशी माणसांनी गजबजणारी ठिकाणे असूनही हा मार्ग दुपारी सुनासुना असतो. कारण सावलीचा पत्ता नाही. जिल्हा न्यायालयापासून सुरू होणारा धामनगाव मार्ग पूर्वी दुतर्फा झाडांनी गच्च होता. आता या मार्गावर सावलीचे काही अवशेषच शिल्लक आहेत. स्टेट बँक चौकात भर उन्हात दुचाकीस्वार पळण्याच्या प्रयत्नात असतात. पण एवढ्या विस्तीर्ण चौकात एकही वृक्ष लावण्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील झाडे केवळ चोरीच्या भीतीने तोडण्यात आली, याबद्दल अनेक कर्मचारी आजही दु:ख व्यक्त करतात.
शहराच्या मुख्य मार्गांवर सावलीचा दुष्काळ असताना नागरिकांनी आपल्या अंगणात मात्र वृक्षराजी फुलविण्याचा प्रयत्न केला आहे. सिंघानियानगरात तर अनेकांनी आंब्याची झाडे जगविलेली दिसतात. लोखंडी पुलाच्या परिसरात अनेक ग्रामस्थांनी कडूलिंबाची झाडे जगवून आपल्या घराला सावलीचे आच्छादन केले आहे. असाच प्रयत्न गेडामनगर, उमरसरा, दर्डानगर, दीपनगर, अशा भागात पाहायला मिळतो. पण कित्येकांच्या घरांना अंगणच नाही. मग झाडे कुठे लावणार? काही शाळांचा परिसर, काही मोजक्या कार्यालयांच्या परिसरातील चार-दोन झाडे सोडली तर यवतमाळात डेरेदार वृक्ष नाहीत. त्यामुळे शहर दिवसेन्दिवस अधिकाधिक गरम होणार आहे.
केवळ इथेच मिळतो विसावा
यवतमाळ शहरात डेरेदार वृक्षांची संख्या अत्यल्प उरली आहे. काही मोजक्या ठिकाणी भरगच्च सावली आढळते. त्यात लोखंडी पुलाजवळील शास्त्रीनगराचा समावेश आहे. येथे वड, पिंपळ, चिंच अशी महाकाय झाडे अजूनही टिकून आहेत. तसेच दर्डा उद्यानाचा परिसरही थंडगार सावलीने समृद्ध आहे. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार वृक्षराजी येथे दिसते. बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरील भागही विस्तीर्ण सावलीचा आहे. कडूलिंबाची मोठ मोठी झाडे असल्याने त्यांच्या सावलीतच भरदुपारीही किरकोळ विक्रेत्यांचा व्यवसाय बहरलेला दिसतो. शिवाजी उद्यानाचा परिसरही सावली धरून आहे. शहरात काही ठिकाणी छोटी मोठी झाडे विरळ प्रमाणात दिसतात. पण या खुरट्या झाडांचा सावलीसाठी उपयोग होत नाही.
अमृत योजना
फलद्रूप होणार का?
केंद्र शासनाच्या अमृत सिटी योजनेत यवतमाळ शहराचा समावेश झाला आहे. त्यात तलाव फैलाचा काही परिसर ग्रिन झोन करण्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात हा परिसर अजूनही हिरवा होऊ शकलेला नाही. शहरात हजारो झाडे लावण्याचा नगरपरिषदेने संकल्प केला होता. पण त्याचे पुढे काय झाले, कळायला मार्ग नाही. शास्त्रीनगरात तीन महिन्यांपूर्वी नगरपरिषदेने वृक्षारोपण केले. पण त्यातील एक-दोन झाडे सोडली, तर इतर झाडे जगविण्यात यश आले नाही. जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे यांनी शहरात २१ हजार झाडे लावण्याची घोषणा केली होती. पण वर्ष लोटूनही या संकल्पाची पूर्ती झालेली नाही.

यांना विचारा सावलीचे मोल ?
४गळव्हा (बाभूळगाव) येथील जयवंताबाई वहाणे आणि पाथ्रट येथील सावित्रीबाई बनसोड या दोन वयोवृद्धा सोमवारी टळटळीत उन्हात काळीपिवळीत बसून यवतमाळात पोहोचल्या. उमरसऱ्यातील पोराच्या घरी पायी जाताना त्यांचे उन्हाने हाल झाले. शिवाजी गार्डनजवळ सावली दिसताच दोघीही मटकन् बसल्या. त्यांनी नातींसाठी भातके घेतले होते. तर तलावफैलात राहणारी पार्वतीबाई इंगोले ही वृद्धा हजार रूपये काढण्यासाठी बँकेत गेली. तेथील बाबूने तिला उद्या येण्यासाठी सांगितल्याने ती भरदुपारी घराकडे निघाली. घामाच्या धारा ओघळू लागल्या. तहान लागली. तेवढ्यात लोखंडी पुलाजवळ
कडूलिंबाची सावली दिसताच ती धापा टाकत बसली. शहरात डेरेदार वृक्षांची गरज किती आहे, हे या वृद्धांच्या थकव्यातून दिसले.

बिल्डरांची बनवेगिरी
४उमरसरा, लोहारा, आर्णी मार्ग, धामणगाव मार्ग, वाघापूर आदी परिसरात नव्या वसाहती उभ्या झाल्या आहेत. हजारोंच्या संख्येने टोलेजंग इमारती झाल्या. आपल्या ले-आऊटमध्ये वृक्षलागवड करण्यात आली आहे, असे सांगून बिल्डरांनी प्लॉट आणि घरे विकली. पण प्रत्यक्षात या वसाहतींमध्ये औषधालाही झाड सापडत नाही. नव्या रहिवाशांनी झाडे लावण्याचा प्रयत्न करून पाहिला. पिण्याच्या पाण्याचेच इतके दुर्भिक्ष की, झाडे जगवायला पाणी कुठून आणावे हा प्रश्न आहे?

Web Title: Shadow drought in the present day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.