शहीद विकास कुळमेथे अमर रहे
By admin | Published: September 21, 2016 01:48 AM2016-09-21T01:48:35+5:302016-09-21T01:48:35+5:30
‘भारत माता की जय’, शहीद विकास कुळमेथे अमर रहे अशा घोषणा देत आपल्या शूर सुपूत्राला पुरडकरांनी अखेरचा निरोप दिला.
नागरिकांच्या घोषणांनी आसमंतही गहिवरले
वणी : ‘भारत माता की जय’, शहीद विकास कुळमेथे अमर रहे अशा घोषणा देत आपल्या शूर सुपूत्राला पुरडकरांनी अखेरचा निरोप दिला. अंत्ययात्रेत सहभागी हजारो नागरिकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली तेव्हा आसमंतही गहिवरले.
जम्मू काश्मिरातील उरी येथे आतंकवाद्याच्या हल्ल्यात शहीद झालेले विकास जनार्दन कुळमेथे यांच्या पार्थिवावर तालुक्यातील पुरड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्रपूरवरून एका सजविलेल्या लष्करी वाहनात त्यांचे पार्थिव आले. त्यावेळी अंत्यदर्शनासाठी नागरिकांची रीघ लागली. राष्ट्रध्वजात गुंडाळलेले शहीद विकासचे पार्थिव फुलांनी सजविलेल्या वाहनावर ठेवण्यात आले. त्यावेळी अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. पुरडचा शूर सुपुत्र देशाच्या कामी आला याचा अभिमान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. परंतु त्याच वेळी विकासची पत्नी स्नेहा, वडील जनार्दन, आई विमल, भाऊ राकेश, बहीण मीरा यांचा आक्रोश उपस्थितांना हेलावून सोडत होता. साऱ्यांचेच डोळे पाणावले होते. शूर सुपुत्राची अंत्ययात्रा विदर्भा नदीकडे निघाली. तेव्हा भारत माता की जय, शहीद विकास कुळमेथे अमर रहे अशा घोषणा दिल्या जात होत्या. या घोषणांनी आसमंतही दणाणून गेला होता. अंत्ययात्रेत आबालवृद्ध सहभागी झाले होते. विदर्भा नदीच्या तीरावर पोलीस दलाने मानवंदना दिल्यानंतर लहान भाऊ राकेशने विकासच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. त्यावेळी उपस्थित नागरिकांना अश्रू आवरता आले नाही. (कार्यालय प्रतिनिधी)