‘शकुंतला’ देऊ शकते विदर्भाच्या अर्थकारणाला बूस्टर; राजकीय इच्छाशक्तीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 10:39 AM2022-05-27T10:39:38+5:302022-05-27T10:41:57+5:30

राज्य व केंद्र शासनाने पुढाकार घेतल्यास शकुंतलेच्या माध्यमातून आदिवासी बहुल यवतमाळसह विदर्भाच्या विकासाला बूस्टर डोस मिळू शकतो.

‘Shakuntala’ train can give a boost to Vidarbha economy | ‘शकुंतला’ देऊ शकते विदर्भाच्या अर्थकारणाला बूस्टर; राजकीय इच्छाशक्तीची गरज

‘शकुंतला’ देऊ शकते विदर्भाच्या अर्थकारणाला बूस्टर; राजकीय इच्छाशक्तीची गरज

Next
ठळक मुद्दे१०८ वर्षांपूर्वीच्या रेल्वेचे पुनरुज्जीवन करून ऐतिहासिक वैभव जोपासण्याचीही संधी

विशाल सोनटक्के

यवतमाळ : यवतमाळकरांसह विदर्भवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शकुंतला रेल्वेच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न रखडला आहे. १०८ वर्षांपूर्वीची ही ऐतिहासिक रेल्वे ब्राॅडग्रेजमध्ये रुपांतरित करून विकसित करण्यासाठी चार वर्षांपूर्वी हालचाली सुरू झाल्या होत्या. २०१७-१८ मध्ये मध्य रेल्वेच्या पिंकबुकमध्येही या कामाला तत्वत: मान्यता मिळाली होती. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा प्रकल्प मागे पडला. आजही या जुन्या मार्गाची लाईन आणि जागा उपलब्ध असल्याने राज्य व केंद्र शासनाने पुढाकार घेतल्यास शकुंतलेच्या माध्यमातून आदिवासी बहुल यवतमाळसह विदर्भाच्या विकासाला बूस्टर डोस मिळू शकतो.

ब्रिटिश काळात १८५७ मध्ये स्थापन झालेल्या किलिक निक्सन या कंपनीने शकुंतला रेल्वेचा प्रकल्प हाती घेतला. १९०९ साली सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील चार वर्षात पटरी, पूल आदी कामे पूर्ण करून या रेल्वेचे २९ डिसेंबर १९१३ रोजी अंतिम परीक्षण पार पडले. १ जानेवारी १९१३ रोजी यवतमाळ-मूर्तिजापूर या ११३ किलोमीटरच्या नॅरोगेज मार्गावरून पहिली मालवाहू रेल्वे धावली. चार तासात ११३ किमीचे अंतर ही रेल्वे कापत असे. त्यानंतर वर्षभरानंतर म्हणजे १ जानेवारी १९१४ रोजी याच मार्गावरून पॅसेंजर रेल्वे सुरू झाली. विदर्भातील हीच रेल्वे पुढे जगप्रसिद्ध ठरली. यवतमाळसह विदर्भातील कापसाच्या गाठी तसेच इमारतीचे लाकूड मँचेस्टरला घेऊन जाण्यासाठी खरे तर ही रेल्वे इंग्रजांनी सुरू केली. रेल्वेने हा कापूस मुंबईला जायचा आणि मग पुढे जहाजाने तो इंग्लंडला पाठविला जात असे. सुरुवातीला या गाडीला स्टीम इंजिन होते. त्यानंतर १९९४ मध्ये स्टीम इंजिनच्या जागी डिझेल इंजिन आले. २०१६ मध्ये ही रेल्वे ब्रिटिशांच्या मालकीतून मुक्त झाली आणि त्यानंतर तिचे धावणेही थांबले. तेव्हापासूनच या रेल्वेला नॅरोगेजमधून ब्रॉडग्रेजमध्ये परावर्तित करून ती पुन्हा सुरू करण्याची मागणी यवतमाळकरांतून होत आहे.

२०१८-१९ मध्ये होती आर्थिक तरतुदीची अपेक्षा

चार वर्षांपूर्वी हा रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. सेंट्रल रेल्वेनेही सर्वेक्षणानंतर या मार्गाच्या विकासाला तत्वत: मान्यता दिली होती. त्यानुसार, २०१७-१८ मध्ये या प्रकल्पाचा रेल्वेच्या पिंकबुकमध्येही समावेश झाला होता. केंद्र आणि राज्य शासनाने या प्रकल्पासाठी आपले आर्थिक योगदान देण्याची तयारी दाखविली होती. मात्र, २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद न केल्याने प्रस्ताव बाजूला पडला. त्यानंतर कोरोना महामारीमुळे या महत्त्वाच्या विषयाकडे कानाडोळा झाला.

शकुंतला रेल्वे यवतमाळ आणि विदर्भाचा ऐतिहासिक ठेवा आहे. आदिवासी बहुल असलेल्या या भागाच्या विकासासाठी या रेल्वेचे पुनरुज्जीवन व्हावे, ही विदर्भवासीयांची भावना आहे. त्यासाठी मागील काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. हा मार्ग ब्रॉडग्रेजमध्ये रुपांतरित करून मार्गी लावल्यास सामान्य जनतेची मोठी सोय होईल. त्यातून या भागाच्या अर्थकारणालाही बळकटी मिळेल. त्यामुळे या रेल्वेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य तसेच केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा.

- विजय दर्डा, माजी राज्यसभा सदस्य.

२०१७-१८ मध्ये मध्य रेल्वेच्या पिंकबुकमध्ये शकुंतला रेल्वेच्या पुनरुज्जीवनाचा विषय होता. अचलपूर-मूर्तिजापूर (७६.०६ किमी), मूर्तिजापूर-यवतमाळ (१११.७७ किमी) आणि पुलगाव-आर्वी (३५.२० किमी) या प्रकल्पासाठी दोन हजार १४७ कोटी खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले होते. केंद्र आणि राज्य शासनाने यासाठी आपल्या हिश्श्याचा खर्च उचलण्याची तयारी दाखविल्याचे रेल्वेच्या पिंकबुकमध्ये नमूद होते.

- अमोल येडगे, जिल्हाधिकारी, यवतमाळ.

Web Title: ‘Shakuntala’ train can give a boost to Vidarbha economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.