शंकर बडेंनी वऱ्हाडी भाषेला लय दिली

By admin | Published: September 5, 2016 12:56 AM2016-09-05T00:56:45+5:302016-09-05T00:56:45+5:30

साहित्य क्षेत्रात यवतमाळची खास ओळख आहे. त्यात शंकर बडे यांनी महाराष्ट्राला नुसत्या वऱ्हाडी कविताच नव्हेतर वऱ्हाडी लय दिली.

Shankar Badeney gave war to the language of the wards | शंकर बडेंनी वऱ्हाडी भाषेला लय दिली

शंकर बडेंनी वऱ्हाडी भाषेला लय दिली

Next

यवतमाळकरांची श्रद्धांजली : चाहत्यांचा स्मृतींना उजाळा
यवतमाळ : साहित्य क्षेत्रात यवतमाळची खास ओळख आहे. त्यात शंकर बडे यांनी महाराष्ट्राला नुसत्या वऱ्हाडी कविताच नव्हेतर वऱ्हाडी लय दिली. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे, अशा शब्दात चाहत्यांनी रविवारी ज्येष्ठ वऱ्हाडी कवी शंकर बडे यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.
येथील नंदूरकर विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या सामूहिक श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी माजी वनमंत्री नानाभाऊ एंबडवार होते. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, कलीम खान, डॉ. प्रकाश नंदूरकर आदी उपस्थित होते. तसेच शंकर बडे यांच्या अर्धांगिनी कौसल्या, मुली कीर्ती, भारती आणि मुलगा गजानन या कुटुंबीयांसह विदर्भभरातील साहित्य, कला, राजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रातील शंकर बडे यांच्या चाहत्यांनी यावेळी आवर्जुन हजेरी लावली.
माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी सांगितले की, शंकर बडे यांच्या अध्यक्षपदामुळे आर्णीचे विदर्भ साहित्य संमेलन ‘टॉप’ ठरले. ते अत्यंत शुद्ध अंतकरणाचे माणूस होते. त्यांचे साहित्य विदर्भातील सर्व ग्रंथालयांपर्यंत पोहोचलेच पाहिजे. पांढरकवड्यातील एका रस्त्याला त्यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात येईल, असा फोन नुकताच तेथील नगराध्यक्षांनी केल्याचेही मोघे यांनी सांगितले.
माजी मंत्री नानाभाऊ एंबडवार म्हणाले की, शंकर बडे यांच्या साहित्याने वाचकांना बरेच काही दिले आहे. हसण्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. शंकर बडेंनी आपल्या साहित्यातून महाराष्ट्रातील लाखो लोकांना हसविले आहे. तर आर्णीचे कलीम खान यांनी गजलेतून शंकर बडेंच्या जाण्याचे दु:ख मांडले.
न हाथ थाम सके ना दामन
बडे करीबसे कोई उठकर चला गया...
या शेराने सभागृह स्तब्ध झाले. खान म्हणाले की, शंकर बडे सहज बोलायचे. पण ते जे सहज बोलायचे ते सुभाषित व्हायचे.
यावेळी बडेंचे मित्र सुरेश कैपिल्यवार म्हणाले, तो यवतमाळचा हिरा होता. तो आमच्या इतका जवळचा होता की त्याचे कधी औपचारिक कौतुक करण्याचा विचारच आला नाही. पण तो अत्यंत निस्वार्थी होता. भगवंतराव जाधव म्हणाले, तो किती मोठा साहित्यिक होता हे आम्हा मित्रांना कळलेच नाही. पण त्याच्या प्रतिभेच्या कक्षा मोठ्या होत्या. ग्राहक मंचाचे माजी अध्यक्ष विजयसिंह राणे म्हणाले, आमच्या गेल्या ४० वर्षांच्या संबंधात मला त्यांच्या विलक्षण प्रतिभेचा प्रत्यय आला होता. त्यांनी जीवनात खूप संघर्ष केला. पण कधीही लबाडपणा केला नाही. तो प्रत्येक गोष्ट बारकाव्यानिशी टिपायचा. त्यांनी आपल्या जीवनातील सर्व प्रसंग जसेच्या तसे लिहावे, असा मी खूप आग्रह धरला. खूप आग्रहानंतर त्यांनी सुरुवातही केली. मात्र, दुर्दैवाने ते पूर्ण होऊ शकले नाही. तब्बल अडीच तास चाललेल्या या सभेत शंकर बडेंच्या गोतावळ्याने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी अरुण लोणारकर यांनी शंकर बडे यांची रांगोळी, तर रवींद्र क्षीरसागर यांनी चित्र रेखाटले. प्रास्ताविक नितीन पखाले यांनी केले. सूत्रसंचालन विवेक कवठेकर यांनी केले.
बोरीअरब
बोरीअरब येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने कविवर्य शंकर बडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. रमेश खंडारे आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. प्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. दीपक कुटे, प्रा. प्रकाश तेलगोटे, प्रा. सुजाता नाईक आदींची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)

सत्तरीतला तरुण !
शंकर बडे यांचे साहित्य वाचले म्हणजे ते सत्तरीचे असतील असे वाटलेच नाही, अशा भावना नानाभाऊ एंबडवार यांनी व्यक्त केल्या. तर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सांगितले की, मतदार जागृतीसाठी आम्हाला तरुणांच्या हृदयाची स्पंदने ओळखणारा ज्येष्ठ साहित्य हवा होता. त्यावेळी आम्ही शंकर बडे काकांना हे काम सोपविले. मतदार जनजागृती अभियानाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम करताना शंकर बडेंनी प्रशासनाला पुरेपुर सहकार्य केले. त्यांचा आवाहनाला तरुणाईकडूनही प्रतिसाद मिळाला.

Web Title: Shankar Badeney gave war to the language of the wards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.