नेर बसस्थानकाला आले गिट्टी खदानीचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 09:54 PM2019-04-24T21:54:27+5:302019-04-24T21:54:49+5:30
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात मोठे अशी ख्याती असलेल्या नेर येथील बसस्थानकाला आज गिट्टी खदानीचे स्वरूप आले आहे. बसस्थानकाच्या संपूर्ण प्रांगणातील उखडलेल्या गिट्टीमुळे एसटी बसचे मोठे नुकसान होत आहे, तर दुसरीकडे प्रवाशांना धूळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात मोठे अशी ख्याती असलेल्या नेर येथील बसस्थानकाला आज गिट्टी खदानीचे स्वरूप आले आहे. बसस्थानकाच्या संपूर्ण प्रांगणातील उखडलेल्या गिट्टीमुळे एसटी बसचे मोठे नुकसान होत आहे, तर दुसरीकडे प्रवाशांना धूळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
सन १९१४ मध्ये याठिकाणी बसस्थानकाची नवीन वास्तू उभी राहिली. पुढे या इमारतीच्या आणि आवाराच्या देखभालीकडे संबंधितांचे पूर्णपणे दुर्लक्ष राहिले. आज या बसस्थानकाच्या आवारात थांबणे म्हणजे, श्वसनाच्या आजाराला निमंत्रण देणारे ठरत आहे. बसस्थानकाचा प्रथमदर्शनी भाग पूर्णपणे उखडला आहे.
उखडलेल्या गिट्टीमुळे बस चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. टायरमुळे उडालेली गिट्टी एखाद्याच्या टाळक्यात बसून मोठा अपघात होण्याचीही भीती नाकारता येत नाही. बस बाहेर काढताना खड्ड्यांचा पसारा चुकविताना चालकाचे नियंत्रण सुटण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात तर प्रवाशांचे कपडे हमखास रंगतात. साचलेल्या पाण्यातून बस भरधाव निघून जाते.
खड्डामय बसस्थानकात एसटी बस नादुरुस्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी फेऱ्या रद्द होत आहे. स्वमालकीच्या वस्तूचे नुकसान होत असतानाही एसटी महामंडळ बसस्थानक दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. आता या ख्याती प्राप्त बसस्थानकाला जुने वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नाची गरज आहे.
प्रवाशांना थंड ऐवजी कोमट पाणी
नेर बसस्थानकावर थंड पाण्याची सोयही करण्याचे सौजन्य महामंडळाने दाखविले नाही. कोमट पाणी पिऊन प्रवाशांना तहान भागवावी लागते. बसस्थानकातील अनेक पंखे बंद आहेत. उकाड्यात बसून बसची प्रतीक्षा करावी लागते. साऊंड सिस्टीम बंद असल्याने प्रवाशांना फलाटावर लागलेल्या बसची माहिती मिळत नाही. बाहेरून एखादी बस आल्यास धावत जाऊन फलक पाहण्यासाठी प्रवाशांची धडपड असते. अनेक समस्यांनी या बसस्थानकाला ग्रासले आहे. यातून केव्हा बाहेर पडेल याची प्रतीक्षा प्रवाशांना आहे.