शरद पवार साधणार ग्रामसभा प्रतिनिधींशी संवाद; १ नोव्हेंबर रोजी वर्धा येथे परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2022 10:31 AM2022-10-29T10:31:11+5:302022-10-29T10:36:59+5:30
वनहक्काच्या प्रभावी अंमलबजावणीवर होणार विचार मंथन
यवतमाळ/वर्धा : राज्यातील सामूहिक वन हक्कप्राप्त ७०० ग्रामसभा प्रतिनिधींशी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार हे १ नोव्हेंबर रोजी संवाद साधणार आहेत. वर्धा येथील गांधी आश्रम सेवाग्राम येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत ही परिषद होणार आहे.
विदर्भ उपजीविका मंचमधील सहभागी असलेल्या विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था, नागपूर, खोज संस्था मेळघाट अमरावती, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, यवतमाळ, ग्राम आरोग्य संस्था, घाटी, जि. गडचिरोली, रिवाईडर्स चंद्रपूर, इश्यू नागपूर, संदेश गडचिरोली आणि विदर्भ सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभा महासंघ आदींच्या वतीने या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे श्रीकांत लोडम यांनी सांगितले. या परिषदेच्या माध्यमातून विदर्भ आणि राज्यात झालेल्या कामाची माहिती सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
याबरोबरच यासाठी आलेल्या विविध अडचणी, प्रश्न, समस्यांचे निराकरण करण्याकरिता आवश्यक उपाययोजना, वन हक्काच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता आवश्यक धोरणात्मक बदल सूचविणे व शासन स्तरावर पाठपुरावा करण्याच्या हेतूने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वन हक्क मिळवून देण्यासाठी लक्षवेधी काम केलेल्या गावांच्या वतीने प्रतिनिधी मनोगत मांडणार आहेत.