शरद रेतीघाट तस्करांच्या हवाली
By admin | Published: July 6, 2017 12:39 AM2017-07-06T00:39:03+5:302017-07-06T00:39:03+5:30
लिलाव झालेला नसतानाही वाघाडी नदीच्या शरद घाटातून रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे.
बेसुमार खनन : घाटंजीतील ट्रॅक्टर चालकांचा धुमाकूळ
अब्दुल मतीन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पारवा : लिलाव झालेला नसतानाही वाघाडी नदीच्या शरद घाटातून रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. जणू महसूल विभागाने हा घाट तस्करांच्या हवाली केला आहे. २५ ते ३० किलोमीटरवरील घाटंजीतील ट्रॅक्टर चालकांनी या घाटावर धुमाकूळ घातला आहे. महसूल विभागाला मात्र कारवाईसाठी सवडच मिळत नाही. यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
वाघाडी नदीतील रेतीचा दर्जा चांगला आहे. काही घाटांचे लिलाव झाले आहे. मात्र शरद घाट यातून सुटला आहे. तरीही चोरट्यांनी या घाटामधून रेतीचे खनन करून नदीपात्राला धोका पोहोचविला आहे. जेसीबीद्वारे मोठमोठे खड्डे पाडून रेती उपसली जात आहे. हा प्रकार एवढ्यावरच थांबत नाही तर नदीकाठांनाही धोका पोहोचविला जात आहे.
शरद घाट ते घाटंजी हे अंतर २५ ते ३० किलोमीटर आहे. एवढ्या लांबची वाहतूक होत असताना कुठल्याही महसूल अधिकाऱ्याने अपवादानेही कारवाई केली नाही. रेती वाहतुकीच्या ट्रॅक्टरमुळे रस्तेही खराब होत चालले आहे. सदर घाट वघारा-टाकळी या गावांची जबाबदारी असलेल्या तलाठ्याच्या अखत्यारित येतो. सदर तलाठी आठ-आठ दिवस या परिसरातही फिरकत नाही. त्यामुळे रेती चोरट्यांना आपसूकच चांगली संधी मिळत आहे. मोठ्या प्रमाणात बुडणारा महसूल वरिष्ठ अधिकारी कारवाई करून वाचवतील, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.