विजयादशमीला 'त्या' म्हणाल्या, ‘मीच माझ्या जीवनाची शिल्पकार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 12:48 PM2021-10-17T12:48:32+5:302021-10-17T13:55:54+5:30

आईवडिलांशिवाय जगणाऱ्या आणि शिकणाऱ्या २५ हून अधिक मुलींना आता हक्काचे होस्टेल मिळणार आहे. विशेष म्हणजे, या होस्टेलचे भूमिपूजनही मुलींनीच स्वत: कुदळ मारून केले.

'She' said to Vijayadashami, 'I am the sculptor of my life' | विजयादशमीला 'त्या' म्हणाल्या, ‘मीच माझ्या जीवनाची शिल्पकार’

विजयादशमीला 'त्या' म्हणाल्या, ‘मीच माझ्या जीवनाची शिल्पकार’

Next
ठळक मुद्देनिराधार, अनाथ मुलींनी मिळविले हक्काचे होस्टेल : शिक्षणाचा मार्ग होणार प्रशस्त

यवतमाळ : कुणाचे आईवडील भिक्षा मागून जगणारे, कुणाचे चोरीत गुंतलेले... अशा झोपडीत जन्माला आलेल्या मुलींचे भवितव्यच अंधकारमय... पण त्यांच्या आयुष्यात अमरावतीतून ‘प्रकाश’ उगवला अन् त्यांना शिक्षणाची वाट सापडली.

आईवडिलांशिवाय जगणाऱ्या आणि शिकणाऱ्या या २५ हून अधिक मुलींना आता हक्काचे होस्टेल मिळणार आहे. विशेष म्हणजे, या होस्टेलचे भूमिपूजनही मुलींनीच स्वत: कुदळ मारून केले. विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून या मुली स्वत:लाच म्हणाल्या, ‘अत्त दीप भव’!

पारधी समाजाकडे आजही पांढरपेशा समाजातून संशयाच्या नजरेने पाहिले जाते. या समाजातील मुली शिकल्या तर हा समाजही विकास साधेल, या भावनेतून अमरावती येथील प्रकाश चव्हाण यांनी त्यांना शिकविण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांनी यवतमाळातून पळवून नेलेल्या, ज्यांना आईवडील नाही, ज्यांना भिक्षा मागायला लावली जात आहे, अशा मुलींचा शोध घेतला. त्यांना एका किरायाच्या घरात ठेवून जवळच्या शाळेत त्यांच्यासाठी शिक्षणाची सोय केली. त्यांच्या या घराला ‘आम्ही साऱ्या सावित्री’ वसतिगृह असे नाव दिले.

या मुलींची व्यवस्था पाहण्यासाठी पपिता माळवे आणि इशू माळवे हे दाम्पत्य ठेवले. त्यासाठी ग्रंथालय कर्मचारी असलेले प्रकाश चव्हाण आपला दरमहिन्याचा अर्धा पगार या मुलींसाठी खर्च करतात. गेले तीन-चार वर्षे हा शिक्षणाचा संघर्ष सुरू असताना आता आर्णी मार्गावर वसतिगृह बांधण्यासाठी जागा मिळाली आहे. या वसतिगृहाचा भूमिपूजन सोहळा धम्मचक्र प्रवर्तनदिनी पार पडला.

यावेळी माजी उच्च शिक्षण सहसंचालक डाॅ. केशव तुपे, पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, महिला बालकल्याणचे जुमळे, ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद घोडाम, जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल कोवे, युथ फोरम जिल्हाध्यक्ष अजय घोडाम, प्रा. कैलास बोके, पारधी, फासेपारधी सर्वांगीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश चव्हाण, वसंत सोळंके, विलास पवार, पपिता इशू माळवे, ज्ञानेश्वर राठोड, जाकीश्वर राठोड, दत्ता काळे, प्रवीण पवार, पंकज पवार, किसन चव्हाण, हरिचंद्र झाडे, विजूकला राठोड, अनुताई माळवे, बिका पवार आदी उपस्थित होते. या मुलींच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द यावेळी शिक्षण संचालकासह पोलीस उपनिरीक्षकांनी दिला.

Web Title: 'She' said to Vijayadashami, 'I am the sculptor of my life'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.