मेंढपाळ बांधवांच्या समस्या सोडवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:25 AM2021-07-23T04:25:36+5:302021-07-23T04:25:36+5:30
फोटो दारव्हा : धनगर समाज मेंढपाळ बांधवांच्या अडचणी सोडवून त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य धनगर ...
फोटो
दारव्हा : धनगर समाज मेंढपाळ बांधवांच्या अडचणी सोडवून त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य धनगर सेवा संस्थेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
गेल्या काही वर्षांपासून मेंढपाळ व्यवसाय संघर्षमय झाला आहे. जंगली कुरणे, वनजमिनी, वनीकरणाच्या जमिनी, गायराने यावर अतिक्रमणे झाल्याने व अनेक अडथळ्यांमुळे मेंढपाळांना मेंढ्या चारणे अशक्य होऊ लागले आहे. मेंढ्या चारण्यासाठी जमिनी शिल्लक राहिल्या नाही. त्यामुळे चराईसाठी जमिनी उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले जावे. पावसाळ्यात दूषित पाणी पिल्याने व दूषित चारा खाल्ल्याने तसेच रस्ता अपघातात शेळ्यामेंढ्या मृत्युमुखी पडतात, अशा घटकांना नैसर्गिक आपत्ती घोषित करून मेंढपाळांना त्वरित आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
मेंढपाळांना सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी ॲट्रॉसिटी कायद्याची तरतूद करावी, आरोग्य विभागामार्फत वाड्या व वस्तीवर जाऊन आरोग्य तपासणी व मोफत लसीकरण करावे, मेंढपाळ सतत भटकंती करीत असल्यामुळे त्यांना हक्काचे घर द्यावे, आदी मागण्याही शासनाकडे करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर ‘बिऱ्हाड मोर्चा’ काढण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना धनगर सेवा संस्थेचे विदर्भ अध्यक्ष दिलीप बांबल, उपाध्यक्ष भास्कर उघडे, जिल्हा उपाध्यक्ष विशाल झाडे, विदर्भ संपर्क प्रमुख दीपक बांबल, तालुका उपाध्यक्ष विजय पिंगाणे, सुनील पुसांडे, चेतन ईसळ, करण कोळेकर आदी उपस्थित होते.