दोन महिन्यापूर्वीच शिजला पूजाच्या खुनाचा कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 03:26 PM2021-11-21T15:26:39+5:302021-11-21T15:33:15+5:30
पूजा अनिल कावळे या विवाहितेच्या खुनाच्या गुन्ह्याला अनेक कंगोरे आहेत. त्याची एकएक बाजू आता पोलीस तपासातून पुढे येऊ लागली आहे.
यवतमाळ : पत्नी व्यवस्थित नांदत नव्हती, या कारणावरून पतीने तिला घटस्फोट मागितला. पत्नीपासून विभक्त राहणाऱ्या पतीने एकट्याने मुलाचे संगोपन केले. मुलगा सहा महिन्याचा झाला तरीही पत्नीकडून प्रतिसाद मिळत नव्हता. शिवाय संयुक्तपणे खरेदी केलेल्या फ्लॅटच्या विक्रीतही पत्नीचा अडसर होता. या सर्व कारणाने संतापलेल्या पतीनेच पत्नीच्या खुनाचा कट रचला. दोन महिन्यापासून त्यावर काम सुरू होते. परिचयातील मुलाला पत्नीशी मैत्री करायला लावून नंतर पद्धतशीरपणे तिचा खून करण्यात आला.
पूजा अनिल कावळे या विवाहितेच्या खुनाच्या गुन्ह्याला अनेक कंगोरे आहेत. त्याची एकएक बाजू आता पोलीस तपासातून पुढे येऊ लागली आहे. पद्धतशीरपणे नियाेजन करून स्वत:ला दूर ठेवत हे हत्याकांड घडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी तांत्रिक बाबी जुळवून आणत मुख्य सूत्रधार असलेला पती अनिल रमेश कावळे याला अटक केली.
पूजा व अनिलचा विवाह झाला. दोघांचा संसार काही दिवस सुरळीत चालला. त्यांना एक मुलगाही झाला. मात्र काही कारणाने अनिलला पूजाची वागणूक खटकू लागली. त्याने ही बाब सासरच्या मंडळींच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्याने पूजापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
दारव्हा न्यायालयात या संदर्भात खटलाही दाखल करण्यात आला. पूजापासून विभक्त राहत असलेल्या अनिलने पुणे येथून गावी परत येण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याने विवाह झाल्याझाल्याच पूजाच्या नावाने पुण्यात फ्लॅट घेतला होता. आता ही मालमत्ता विकून त्याला गावी यायचे होते. त्यासाठी पूजाची एनओसी आवश्यक होती. पूजा ती एनओसी देण्यास टाळाटाळ करीत होती. पूजापासून विभक्त होऊनही अनिल अप्रत्यक्षरीत्या अस्वस्थच होता. पूजाच्या अनेक बाबी त्याला कायम खटकत होत्या. या जाचातून मुक्त होण्यासाठी अनिलला कळंब येथील गौरव रामभाऊ राऊत (२१) याने काही सल्ला दिला. नंतर उज्वल पंढरी नगराळे (२२) रा. राळेगाव याच्या माध्यमातून पूजाशी संपर्क करण्यात आला. उज्वलने पूजाला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविली. पूजानेही उज्वलला प्रतिसाद दिला. यातून दोघांची मैत्री झाली. काही दिवस ऑनलाईन चॅटिंग झाले. पूजाचा विश्वास बसल्याचा अंदाज येताच तिच्या हत्येचा कट रचण्यात आला.
पूजा तिच्या वडिलांकडे वाईगौळ ता. मानोरा जि. वाशिम येथे दिवाळीनिमित्त आली होती. ती परत पुण्याला जाणार होती. वाहने बंद असल्याची संधी साधत उज्वलने पूजाला पुणे येथे कारने सोडून देण्याचा प्रस्ताव ठेवला. पूजाने तो मान्य केला. दिग्रसच्या मानोरा चौकातून पूजा उज्वलने आणलेल्या कारमध्ये बसली. तिला सावंगी बु. शिवारातील शेतात नेऊन तिचा खून करण्यात आला. यावेळी गौरव राऊत आणि अभिषेक बबन म्हात्रे रा. शिंदी बु. ता. अचलपूर जि. अमरावती हा सोबत होता.
पूजाचा खून केल्यानंतर आरोपी त्यांच्या गावी परतले. खुनाची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्यांची जुळवाजुळव केली. सर्व प्रथम गौरव राऊत याला ताब्यात घेतले. त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र त्याच्याकडून सर्व हकीकत हाती आल्यानंतर तीनही आरोपींना अटक केली. या गुन्ह्यात वापरलेली कार व त्यावरील चालक याचा शोध पोलीस घेत आहे.
सहा वर्षाचा आर्य झाला पोरका
पूजा व अनिल या दोघांचा सहा वर्षाचा मुलगा आर्य आता पोरका झाला आहे. पूजापासून विभक्त झाल्यानंतर अनिलनेच मुलाचा सांभाळ केला. अनिलला पोलिसांनी अटक केली. तर, पूजाचा खून झाला. त्यामुळे हा मुलगा आई व वडील या दोघांच्या छत्रछायेतून उघडा पडला आहे. आई-वडिलांच्या चुकीचा निर्णयाची किंमत निष्पाप बालकाला मोजावी लागत आहे.