शिंगाडा तलावाचे अस्तित्व धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:19 PM2019-02-17T22:19:06+5:302019-02-17T22:19:39+5:30
शहराचे भूषण असलेल्या येथील इंग्रजकालीन शिंगाडा तलाव प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अखेरचा घटका मोजत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासनातर्फे तलावाचे खोलीकरण न करण्यात आल्याने आता केवळ पाण्याचे डबकेच साचले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शहराचे भूषण असलेल्या येथील इंग्रजकालीन शिंगाडा तलाव प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अखेरचा घटका मोजत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासनातर्फे तलावाचे खोलीकरण न करण्यात आल्याने आता केवळ पाण्याचे डबकेच साचले आहे. लोकसहभागातून या तलावाच्या खोलीकरणाच्या कामाला सुरूवातही केली होती. मात्र ते काम अर्धवट सोडल्याने हा तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
ब्रिटीशकाळात वणी जिल्हा असल्यामुळे या परिसरात विहिरीचे स्त्रोत जिवंत ठेवण्यासाठी तलवाची निर्मिती करण्यात आली होती. इंग्रजांनी २५ एकर परिसरात हा तलाव बनवून तीन मोठे बुरूज यामध्ये ठेवण्यात आले होते. जत्रा मैदानातील बैल बाजारात येणारी जनावरे याच तलावाच्या भरवशावर आपली तहान भागवत होती. तसेच विदर्भाचा शिंगाडा विदर्भात प्रसिद्ध होता. या शिंगाड्याच्या भरवशावर भोई समाजबांधव आपली उपजिवीका भागवत होते. तसेच या तलावाच्या भरवशावर मासेमारीसुद्धा करण्यात येत होती. मात्र आता या तलावाचेच अस्तित्व धोक्यात आल्याने हा व्यवसायही धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे शहरातील संपूर्ण सांडपाणी या तलावात शिरत असल्याने पाण्यालाही दुर्गंधी सुटली आहे. या तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी वणीच्या मच्छिमार सहकारी संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली होती. मात्र अद्यापही या निवेदनावर प्रशासनातर्फे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
चार कोटी ४९ लाखांचा निधी गेला तरी कुठे?
वणी शहरातील तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी व पुनरुज्जीवनासाठी शासनातर्फे चार कोटी ४९ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामाचे भूमिपूजन करून तसा फलकही तलावाच्या परिसरात लावण्यात आला होता. मात्र तेव्हापासून या तलावाचे सौंदर्यीकरण न झाल्यामुळे हा निधी गेला तरी कुठे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.