शिरपूर परिसरात वाघाचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:00 AM2018-10-07T00:00:14+5:302018-10-07T00:00:45+5:30
गेल्या एक आठवड्यापासून शिरपूर परिसरात पट्टेदार वाघाचा वावर असून दररोज वाघाचे दर्शन होत असल्याने हा परिसर दहशतीखाली वावरत आहे. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरपूर पोलिसांनी ज्या गाव परिसरात वाघाचे दर्शन झाले, तेथे जाऊन गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : गेल्या एक आठवड्यापासून शिरपूर परिसरात पट्टेदार वाघाचा वावर असून दररोज वाघाचे दर्शन होत असल्याने हा परिसर दहशतीखाली वावरत आहे. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरपूर पोलिसांनी ज्या गाव परिसरात वाघाचे दर्शन झाले, तेथे जाऊन गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सतर्क राहण्याचे आवाहन केले.
राळेगाव तालुक्यात नरभक्षी वाघिणीचा धुमाकूळ सुरू असतानाच शिरपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक पट्टेदार वाघ भटकत आहे. २ आॅक्टोबरला शिरपूर शिवारातील एका शेतात या वाघाने दर्शन दिले. काहींनी त्याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरलदेखिल केला. याच वाघाने मागील आठवड्यात निवली येथे एका गोºह्यावर हल्ला करून त्याला ठार केले. त्यामुळे नागरिकांच्या दहशतीत भर पडली आहे. ४ आॅक्टोबरला हाच वाघ खांदला शिवारात फिरत होता. अनेक नागरिकांनी त्याला पाहिले. ५ आॅक्टोबरला सुंदरनगर परिसरात हा वाघ भटकत होता, तर शनिवारी या वाघाने निवली परिसरातील नागरिकांना दर्शन दिले. यामुळे नागरिक शेतात जाण्यासाठी घाबरत असून शेतातील कामे त्यामुळे खोळंबली आहेत. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरपूरचे ठाणेदार दीपक पवार, पीएसआय योगेश दंदे, राजू बागेश्वर, योगेश ढाले यांनी परिसरातील खांदला, सुंदनगर, निवली यासह विविध गावांमध्ये भेटी देऊन नागरिकांना मार्गदर्शन केले.
एकट्याने जंगल शिवारात जाऊ नये, वाघ दिसल्यास तातडीने पोलिसांशी अथवा वनविभागाशी संपर्क करून माहिती द्यावी, रात्रीच्यावेळी अंगणात गुरेढोरे बांधू नयेत, वाघ दिसल्यास त्याच्याशी कुणीही छेडछाड करू नये, तातडीने सुरक्षितस्थळी पोहोचावे, अशा सूचनाही ठाणेदार दीपक पवार यांनी नागरिकांना केल्या.
वाघाचे दरदिवशी दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भय निर्माण झाले आहे. हा वाघ पाळीव जनावरांवर हल्ले करत असल्याने गोपालकांनी जनावरांच्या चराईसाठी जंगलात जाणेही बंद केले आहे.
वनविभागाप्रती नागरिकांचा रोष
शिरपूर परिसरात वाघाचा मुक्तसंचार सुरू असताना वनविभागाचे अधिकारी मात्र या विषयात गंभीर नसल्याचा आरोप उकणीच्या सरपंचा संगीता खाडे यांनी केला आहे. निवली येथे वाघाने गोºह्यावर हल्ला केल्यानंतर त्याच दिवशी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. परंतु वनविभागाच्या अधिकाºयांनी दुसऱ्या दिवशी या गावाला भेट देऊन पाहणी केली.