शिवसेनेतर्फे ६०० महिलांना शिवणयंत्रांचे वाटप

By admin | Published: January 23, 2016 02:34 AM2016-01-23T02:34:17+5:302016-01-23T02:34:17+5:30

गर्दीतून उठलेल्या ‘जय भवानी जय शिवाजी’च्या नाऱ्यांनीच युवासेना प्रमुखांच्या भाषणाला भक्कम ‘बॅकअप्’ दिला.

Shiv Sena distributed sewing machines to 600 women | शिवसेनेतर्फे ६०० महिलांना शिवणयंत्रांचे वाटप

शिवसेनेतर्फे ६०० महिलांना शिवणयंत्रांचे वाटप

Next

आदित्य ठाकरेंनी साधला युवकांशी संवाद : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कुटुंबांना मदत
यवतमाळ : गर्दीतून उठलेल्या ‘जय भवानी जय शिवाजी’च्या नाऱ्यांनीच युवासेना प्रमुखांच्या भाषणाला भक्कम ‘बॅकअप्’ दिला. जय महाराष्ट्र म्हणताना जोर असला तरी, या आवाजाला सध्याच धार नाही. कारण अजूनही महाराष्ट्रात दुष्काळ, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या असे अनेक प्रश्न कायम आहेत. या प्रश्नांचा फडशा पाडल्यानंतरच आपल्याला खऱ्या अभिमानाने ‘जय महाराष्ट्र’ म्हणता येईल... अशा भावनिक आवाहनाने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गर्दीवर गारुड केले. युवकांच्या कलाने राजकारणाचा धागा पकडताना आदित्य ठाकरे म्हणाले, कलेचा वारसा मला पणजोबांपासूनच मिळाला. मीही कधी कधी कविता करतो. ही कलाकारी करताना समाजाचाच विचार असतो. मात्र, माझी कलाकारी काँग्रेससारखी नाही बरं का! अशी कोपरखळीही युवासेना प्रमुखांनी मारली. नुकताच मराठवाड्यात गेलो होतो. तिथे साडेतीन हजार शेतकऱ्यांना शिवसेनेने मदत केली. मदत केली, असे अभिमानाने सांगत असलो तरी ही खरे म्हणजे दु:खाचीच बाब आहे. शेतकऱ्यांना यापुढे कुणाच्याही मदतीची गरजच भासू नये. त्यासाठीच त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या योजना आवश्यक आहेत. मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नातून २५ कोटींच्या योजना आम्ही आणू शकलो. शासनाकडून २५ कोटींच्या योजना आणण्यासाठी ६५ लाख रुपयांच्या लोकसहभागाची गरज होती. हे पैसे गरीब शेतकरी कसे देणार? म्हणून उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्र प्रदर्शनातून हे ६५ लाख उभे करण्यात आले. शिवसेनेने केलेली ही मदत नव्हे, ते आमचे कर्तव्यच आहे. विदर्भातील शेतकऱ्यांसाठीही आमचा हाच प्रयत्न आहे. आता शिलाई मशीन दिल्या. त्यांचे प्रशिक्षणही देऊ. नुसते बोलणे हा शिवसेनेचा स्वभाव नाही, तर कर्तव्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या योजनांची अंमलबजावणी निट होते की नाही, याकडे प्रसारमाध्यमांनी जरूर लक्ष ठेवावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले, कर्तृत्ववान माणसाला कर्तृत्वातूनच आदरांजली दिली पाहिजे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू असा शब्द दिला होता. शिलाई मशीनच्या वाटपातून आम्ही त्या शब्दाला जागत आहोत. शेतीचे अनेक प्रश्न आहेत. त्यात निसर्गाच्या लहरीपणाचाच अधिक भाग आहे. निसर्गापुढे आपले फारसे चालत नाही. पण शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांसाठी आपण बरेच काही करू शकतो. त्यासाठीच आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. पण नुसती पैशांची मदत देऊन भागणार नाही? त्यासाठी प्रत्येक शेतकरी महिलेला स्वत:च्या पायावर उभे केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी आम्हाला बाळासाहेबांनीच स्फूर्ती दिली. त्याला आम्ही कायम जागू. शेतकरी भगिनींनो, कधीही परकेपणा वाटून घेऊ नका. धीराने जगा आणि पुढे जा, असे भावनिक आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.
खासदार भावना गवळी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. सूत्रसंचालन शहरप्रमुख पराग पिंगळे यांच्यासह अमरावतीचे कवी नितीन देशमुख यांनी केले. यावेळी खासदार अनिल देसाई, शिवसेनेचे संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, उपनेत्या विशाखा राऊत, मीना कांबळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुखव्दय विश्वास नांदेकर, संतोष ढवळे, उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकूर, वाशीमचे जिल्हा प्रमुख राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Shiv Sena distributed sewing machines to 600 women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.