शिवसेना नेत्यांमधील वाद समझोत्यापलीकडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 10:16 PM2018-05-09T22:16:45+5:302018-05-09T22:16:45+5:30
गेली कित्येक वर्षे संजय राठोड यांच्या नेतृत्वात एकसंघ असलेल्या जिल्हा शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात दुसरा गट तयार झाला आहे.
राजेश निस्ताने।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेली कित्येक वर्षे संजय राठोड यांच्या नेतृत्वात एकसंघ असलेल्या जिल्हा शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात दुसरा गट तयार झाला आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये समझोता होण्याची चिन्हे दिसत नसल्याने शिवसेनेतील सामान्य कार्यकर्तेही नाईलाजाने का होईना विभागले जाण्याची शक्यता आहे.
भावना गवळी यांची खासदारकीची चौथी टर्म आहे. गेली कित्येक वर्षे त्यांनी जिल्ह्यात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात अथवा साथीने पक्षाचे काम केले. परंतु जिल्हा प्रमुख पदावरील नियुक्तीच्या निमित्ताने या नेत्यांमधील वाद अचानक उफाळून आला. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मिटला नाही. एवढेच काय खुद्द ‘मातोश्री’वर सुद्धा वाद मिटविण्याचे प्रयत्न झाले. परंतू यश आले नाही. भावना गवळींनी सूचविल्यानुसार तीन जिल्हा प्रमुखांच्या झालेल्या नियुक्त्यांमधून हा वाद मिटणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. तर काल-परवा संजय राठोड गटाच्या युवा सेना प्रमुखाला जिल्हा प्रमुख पदावरून निष्कासित करण्यात दुसऱ्या गटाला आलेले यश पाहता नेत्यांमधील हा वाद आणखी पेटणार असल्याची चिन्हे आहेत. रक्तदान शिबिरापासून हा वाद बराच वाढला आहे. आता तर हे नेते कोणत्याही कार्यक्रमात एकमेकांची उपस्थिती असेल, फ्लेक्सवर फोटो असेल तरी तेथे जाणे टाळतात. यावरून या नेत्यांंमध्ये किती मोठ्या प्रमाणात कटुता निर्माण झाली, हे स्पष्ट होते. ही कटुता वाढविण्यास दोन्ही नेत्यांच्या अवती-भोवती वावरणारी चौकडी अधिक कारणीभूत असल्याचे बोलले जाते. यात पक्षाचे मात्र विविध स्तरावर नुकसान होत आहे. एकसंघ असलेला शिवसैनिकही आता उघडपणे गटा-तटात विभागला जातो आहे. ११ मे रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपुरात येत आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तेथे चर्चा होणार आहे. मात्र नेत्यांमधील या वादावर तेथे चर्चा होण्याची आणि झालीच तर त्यातून फार काही तोडगा निघण्याची शक्यता नसल्याचे सेनेच्या गोटात मानले जाते.
साम्राज्याला धक्के देण्याचा प्रयत्न
संजय राठोड यांच्या साम्राज्याला जणू धक्के देण्याचा निर्धारच विरोधी गटाने केल्याचे दिसून येते. आधी आपल्या सोईने तीन जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्या ‘मातोश्री’वरुन करून आणल्या. त्यात भावना गवळींनी आपल्या सोईचा एकच जिल्हा प्रमुख आपल्या लोकसभा मतदारसंघात ठेवला. दुसऱ्या दोघांची चंद्रपूर व हिंगोली लोकसभा मतदारसंघात रवानगी करण्यात यश मिळविले. आता युवा सेना प्रमुख निशाण्यावर आहे. बाभूळगावातील सेना तालुका प्रमुख आधीच बदलविण्यात आले आहे. यवतमाळचा तालुका प्रमुख विरोधी गटाच्या सोईचा आहे. या लोकसभा मतदारसंघातील अन्य ठिकाणीही भविष्यात सोईने चेंज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दारव्हा, दिग्रस, नेर या तीन तालुक्यांमध्ये मात्र विरोधी गटाकडून कोणताही हस्तक्षेप होण्याची शक्यता नाही. त्यांना तो अधिकारही नसल्याचे सांगितले जाते. चंद्रपूर व हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या तालुक्यांमध्ये चेंजचा विरोधी गटाचा कदाचित ‘इन्टरेस्ट’ नसू शकतो.
गटबाजीने सामान्य शिवसैनिक अस्वस्थ
संजय राठोड व भावना गवळींमधील या वादात दोन्ही गटाचे काही निवडक समर्थक खूष दिसत असले तरी सामान्य शिवसैनिक व शिवसेनेला मानणारा मतदार वर्ग मात्र नाराज आहे. नेत्यांच्या या भांडणात पक्षाचे नुकसान होऊ नये, ही त्यांची प्रामाणिक भावना आहे. या नेत्यांमध्ये समेट न झाल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला फटका बसण्याची व काँग्रेस, भाजपाला आयताच फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नेत्यांमधील हा वाद कायम राहिल्यास लोकसभा निवडणुकीत संजय राठोड समर्थकांची भाजपाच्या संभाव्य उमेदवाराला सहानुभूती राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर हीच खेळी भावना गवळींकडून दिग्रस विधानसभा निवडणुकीत खेळली जाऊ शकते.
राठोड समर्थक ‘आरपार’च्या तयारीत
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा ९० हजार मतांनी पराभव झाला. या मतदारसंघासाठी नवखा उमेदवार व तयारीला कोणताही वेळ मिळाला नसताना राज्यात काँग्रेसचा उमेदवार सर्वात कमी मताने येथे पराभूत झाला. अर्थात मोदी लाट नसती तर शिवसेनेला पराभवाचे निश्चितच तोंड पहावे लागले असते.
यावेळी नोटाबंदी, जीएसटी, आरक्षण या कारणांमुळे काँग्रेसला पोषक वातावरण आहे. या उलट स्थिती शिवसेनेची आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे सेनेला आणखी नुकसान होऊ शकते.
गेल्या विधानसभेत संजय राठोड राज्यात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते घेऊन विजयी झाले होते. यावेळी सेनेतील दुसऱ्या गटाकडून दगा-फटका झाल्यास फार तर मतांचा लिड पाच-दहा हजाराने कमी होईल, यापेक्षा जास्त नुकसान होणे नाही, असा दावा राठोड समर्थकांकडून केला जात आहे. परंतु आता ‘इसपार या उसपार’ असे चित्र लोकसभा निवडणुकीत दिसणार असल्याचे संकेतही राठोड समर्थकांच्या चर्चेतून मिळत आहे.