राणेंच्या मंत्रिपदाने शिवसेना आणखी त्वेषाने वाढेल - उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 11:34 AM2021-07-10T11:34:01+5:302021-07-10T11:36:57+5:30
शुक्रवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने यवतमाळ जिल्हा प्रशासनाला आठ व्हेंटिलेटर सोपवून त्याचे लोकार्पण करण्यासाठी उदय सामंत यवतमाळात आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यवतमाळ : मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना मंत्रिपद दिल्याने शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट आता शिवसेना महाराष्ट्रात अधिक त्वेषाने वाढेल, जोमाने काम करील, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने यवतमाळ जिल्हा प्रशासनाला आठ व्हेंटिलेटर सोपवून त्याचे लोकार्पण करण्यासाठी उदय सामंत यवतमाळात आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेनेचे कट्टर टीकाकार असलेले नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. त्यामुळे मुंबईसह कोकणातील शिवसेनेला हादरा बसेल अशा वावड्या जाणीवपूर्वक उठविल्या जात असल्याचे सांगत, प्रत्यक्षात जेव्हा-जेव्हा शिवसेनेला अशा पद्धतीने डिवचले जाते, तेव्हा शिवसैनिक अधिक जोमाने कामाला लागतो.
हे व्हेंटिलेटर बिघडणार नाही -
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेले व्हेंटिलेटर बिघडणार नाही. कारण हे व्हेंटिलेटर केंद्र शासनाने पाठविलेल्या व्हेंटिलेटरप्रमाणे कामचलाऊ नाही. केंद्राने यवतमाळात पाठविलेल्या ३५ व्हेंटिलेटरपैकी केवळ २१ व्हेंटिलेटर सुरू आहेत, तर उर्वरित १४ खराब निघाले. हीच परिस्थिती केंद्राने अन्य जिल्ह्यांमध्ये पाठविलेल्या व्हेंटिलेटरची आहे, अशी टीका उदय सामंत यांनी केली.