मध्यावधीच्या दिशेने शिवसेनेची पक्षबांधणी
By admin | Published: March 30, 2017 12:02 AM2017-03-30T00:02:28+5:302017-03-30T00:02:28+5:30
राज्यात शिवसेना-भाजपा युती सरकारचे भवितव्य काय, याच्या संख्याबळाच्या आधारावर राजकीय चर्चा झडत असतानाच
लवकरच फेरबदल : पदाधिकाऱ्यांना विधानसभेसाठी मोकळे करणार, अनेकांना मिळणार बढती
यवतमाळ : राज्यात शिवसेना-भाजपा युती सरकारचे भवितव्य काय, याच्या संख्याबळाच्या आधारावर राजकीय चर्चा झडत असतानाच यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेने मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने पक्ष बांधणी सुरू केली आहे. त्यासाठी जिल्हा शिवसेनेत व्यापक फेरबदल केले जाणार आहेत.
राज्यात युतीचे सरकार असले, तरी भाजपा-शिवसेनेतील संबंध बिघडले आहेत. भाजपा दुय्यम वागणूक देत असल्याचा सेनेतील सूर आहे, तर शिवसेना सत्तेत असूनही विरोधकांच्या भूमिकेत वावरत असल्याचा भाजपाचा आरोप आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीप्रमाणे जणू विरोधकाची भूमिका वठवित भाजपाच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळेच भाजपातसुद्धा ‘आता बस्स झाले’ असा सूर ऐकायला मिळतो आहे. यावरून दोनही पक्ष पुढील कोणत्याही परिणामाला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यादृष्टीने यवतमाळ जिल्ह्यातही शिवसेनेकडून चाचपणी केली जात असल्याची माहिती आहे. शिवसेना नेते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड स्वत: तालुकानिहाय बैठका घेऊन ‘मध्यावधी झाल्यास काय चित्र राहील’ याचा आढावा घेत आहेत.
शिवसेना तर उघडपणे मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने पक्ष बांधणीची तयारी करताना दिसत आहे. शिवसेनेतील विद्यमान प्रमुख पदाधिकाऱ्यांना विधानसभेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून पदमुक्त केले जाणार आहे. अधिकाधिक वेळ पक्ष बांधणी व जनतेत घालविण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. या महत्वाच्या पदांवर नव्या चेहऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. पक्षातीलच तरुण चेहऱ्यांना बढती देऊन त्यांच्या खांद्यावर जिल्ह्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. त्यात एका जिल्हा परिषद सदस्यालाही लॉटरी लागून आठ तालुक्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता सेनेच्या गोटात वर्तविली जात आहे.
यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात आता लगतच्या आठ ग्रामपंचायती समाविष्ट झाल्याने शहराचा व्याप वाढला आहे. म्हणूनच यवतमाळ शहरासाठी शिवसेनेचे पूर्व-पश्चिम असे दोन प्रमुख नेमण्याचा विचारही केला जात आहे. विधानसभेच्या दृष्टीने गतवेळच्या पराभूतांंनाच पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यवतमाळ शहराचा विचार केल्यास येथे शिवसेनेची ताकद चांगलीच वाढली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघात शिवसेनेला ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या तुलनेत शहरात सेनेची ताकद कमी पडली होती. त्यामुळे अवघ्या १२०० मतांनी सेनेच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु आता चित्र बदलले आहे. यवतमाळचे नगराध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. नगराध्यक्षांना तब्बल ४३ हजारांवर मते मिळाली होती. यवतमाळ नगरपरिषदेत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एक वरून तब्बल आठवर पोहोचली आहे. या माध्यमातूनही सेनेची ताकद प्रचंड वाढली आहे. त्या बळावरच यवतमाळ विधानसभा काबीज करून भाजपाला त्यांची जागा दाखविण्याची व्यूहरचना शिवसेनेत आखली जात आहे.
यवतमाळ विधानसभेत ऐनवेळी इच्छुकाचा चेहरा बदलविला जाण्याची व निवडणुकीचा दीर्घ अनुभव पाठीशी असलेल्या व्यक्तीला निवडणुकीच्या आखाड्यात पुन्हा उतरविले जाण्याची शक्यता सेनेच्या गोटात वर्तविली जात आहे. या मतदारसंघातील प्रबळ दावेदार स्वत:हून बाजूला होण्यास तयार असल्याने नव्या चेहऱ्याला संधी देण्यात फारशा अडचणी नेत्यांपुढे राहणार नसल्याचे सेनेच्या गोटातून सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)
भाजपाचीही चाचपणी, योजनांवर भर
शिवसेनेची तयारी पाहता भाजपाही मागे नाही. विविध बैठका व आढाव्याच्या आडोश्याने भाजपा नेतेही ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून मध्यावधीबाबत त्यांची मते जाणून घेतली जात आहे. शिवाय शासनाच्या योजना गावखेड्यापर्यंत पोहोचविण्यावर भर सुरू आहे. या अनुषंगाने नुकताच येथे पंचायत समिती गणनिहाय आढावा घेतला गेला. मध्यावधीबाबत भाजपाची नेते मंडळी अधिकृतरीत्या काहीही बोलत नसली, तरी प्रत्यक्षात त्याच्या तयारीचे संकेत त्यांच्या सततच्या कार्यक्रमांवरून मिळत आहे.