वणी शहरात शिवसेनेच्या अभिवादन फलकाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:25 PM2019-01-23T22:25:49+5:302019-01-23T22:27:50+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या एका गटाने वणी शहरात लावलेले अभिवादन फलक अज्ञात समाजकंटकाने चोरून नेल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उजेडात आला. त्यामुळे शिवसेनेचा संबंधित गट चांगलाच बिथरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या एका गटाने वणी शहरात लावलेले अभिवादन फलक अज्ञात समाजकंटकाने चोरून नेल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उजेडात आला. त्यामुळे शिवसेनेचा संबंधित गट चांगलाच बिथरला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार करण्यात आली.
वणी शहरात शिवसेनेचे दोन गट असून यांपैैकी एका गटाचे नेते सुनील कातकडे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात विविध ठिकाणी अभिवादन फलक लावले होते. मात्र बुधवारी सकाळी या फलकांपैैकी शिवाजी चौैक, नांदेपेरा मार्गावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाजवळ, बसस्थानकाजवळ व घोन्सा फाटा अशा चार ठिकाणचे फलक अज्ञात समाजकंटकाने लंपास केले. ही बाब उघडकीस आल्यानंतर कातकडे गट संतप्त झाला. दुपारी १२ वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर या गटाचे शेकडो कार्यकर्ते सुनिल कातकडे यांच्या नेतृत्वात पोलीस ठाण्यात पोहचले.
जोवर आरोपीला अटक करण्यात येणार नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हटणार नाही, अशी भूमिका या शिवसैैनिकांनी घेतली. मात्र चौैकशीसाठी थोडा वेळ द्या, अशी विनंती पोलिसांनी केली. त्यामुळे शिवसैैनिकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. सुनिल कातकडे यांनी याप्रकरणी रितसर तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला.