शिवसेनेचे उपोषण आंदोलन चिघळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:52 PM2019-01-15T23:52:19+5:302019-01-15T23:54:41+5:30
वेकोलित कार्यरत खासगी कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना सामावून घ्यावे, या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून वणी तहसीलसमोर उपोषणाला बसलेल्या शिवसैनिकांनी मंगळवारी उग्र भूमिका घेत रास्तारोको आंदोलन केले. त्यानंतर लगेच रस्त्यावर टायरची जाळपोळ केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वेकोलित कार्यरत खासगी कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना सामावून घ्यावे, या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून वणी तहसीलसमोर उपोषणाला बसलेल्या शिवसैनिकांनी मंगळवारी उग्र भूमिका घेत रास्तारोको आंदोलन केले. त्यानंतर लगेच रस्त्यावर टायरची जाळपोळ केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या घटनेमुळे मुख्य रस्त्यावर दोनही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत केली. हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वणी तालुक्यातील निलजई, जुनाड, कोलारपिंपरी या कोळसा खाणीत एचडीओबी, आरपीएल, सदभाव या खासगी कंपन्यांमार्फत कामे केली जात आहेत. मात्र या कंपन्यांनी स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगार युवकांना कामावर घेतले नाही. त्यामुळे या बेरोजगारांना कंपनीने सामावून घ्यावे, या एकमेव मागणीसाठी सोमवारपासून येथील तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी बेरोजगारांना सोबत घेऊन उपोषण सुरू केले होते. मंगळवारी दुसऱ्या दिवशी सकाळी शिवसेनेतर्फे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांना स्मरणपत्र देण्यात आले. तसेच या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तात्काळ प्रतिनिधी पाठवावे, अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र अर्धा तास लोटूनही प्रशासनातर्फे कोणताही प्रतिनिधी उपोषणस्थळी पाठविण्यात आला नाही. त्यामुळे उपोषणकर्ते विश्वास नांदेकर व शिवसैनिक आक्रमक झाले. सर्वप्रथम तहसील चौकात संतप्त उपोषणकर्त्यांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात केली. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
शिवसैनिकांच्या संयमाचा बांध फुटल्याने अखेर तहसीलसमोर टायरची जाळपोळही करण्यात आली. यावेळी उपोषणकर्त्यांनी वेकोलि व प्रशासनाविरोधात जोरदार नारेबाजी केली. या घटनेमुळे तहसील परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. तणावाची स्थिती निवारण्यासाठी अग्नीशमन दल व पोलीस दलाला उपोषणस्थळावर पाचारण करण्यात आले. यावेळी पोलिसांनी परिस्थिती निवारून मार्ग मोकळा केला. शिवसेनेच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे आता पुन्हा हे उपोषण तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या या आंदोलनात राजू तुराणकर, अभय सोमलकर, सतीश वºहाटे, चंद्रकांत घुगुल, संतोष माहूरे, शरद ठाकरे, डिमन टोंगे, योगीता मोहोड, प्रणीता घुगुल, सविता आवरी, मधुकर झोडे, गुलाब आवारी, वनिता काळे, संजय आवारी, दीपक कोकास, अजय नागपूरे, प्रशांत बल्की, तेजराज बोढे, महेश चौधरी, सचिन मते, राजु वाघमारे, मोरेश्वर पोतराजे व शेकडो शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता.