शिवसेनेचे एकमेव आमदार संजय राठोड यांच्या खांद्यावरही बंडाचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 05:00 AM2022-06-24T05:00:00+5:302022-06-24T05:00:22+5:30
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जिल्ह्यातील सर्वांच्याच नजरा राठोड यांच्या भूमिकेकडे लागल्या होत्या. बंडखोर आमदारांनी सूरत गाठल्यानंतर राठोड यांंचे नाव चर्चेत आले. मात्र, शिवसेनेच्या बैठकीला ते ‘मातोश्री’वर उपस्थित होते. त्यामुळे राठोड यांची नेमकी भूमिका काय याबद्दल संभ्रम निर्माण झालेला असतानाच गुरुवारी ते आमदार दादा भुसे यांच्यासोबत गुवाहाटीकडे रवाना झाले. रात्री ९.३० च्या सुमारास संजय राठोड यांच्यासह दादा भुसे आणि रवींद्र फाटक गुवाहाटीत पोहोचल्याचेही सांगण्यात आले.
विशाल सोनटक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मागील २५ वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असलेले जिल्ह्यातील पक्षाचे एकमेव आमदार संजय राठोड हेही अखेर गुरुवारी गुवाहाटीकडे रवाना झाले. तत्पूर्वी बुधवारी मध्यरात्रीपर्यंत राठोड यांनी जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत आपण काय भूमिका घ्यायला हवी, तुम्हाला काय वाटते, अशी विचारणा त्यांनी अनेकांना केली. दरम्यान, राठोड हे बंडखोरांच्या गटात सामील होत असले तरी जिल्हाप्रमुखांनी शिवसेनेबरोबरच ठामपणे राहण्याचे निश्चित केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यापासून जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे आमदार संजय राठोड यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. राठोड यांनी वयाच्या २१ व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचा भगवा हातात घेतला. वयाच्या २७ व्या वर्षी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली. त्यानंतर दारव्हा-दिग्रस-नेर या तालुक्यांत शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करून २००४ मध्ये तत्कालीन गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. त्यानंतर २००९, २०१४ आणि २०१९ असे चार वेळा मोठ्या फरकाने विजयी होत त्यांनी सेनेचा बालेकिल्ला कायम राखला. युती सरकारमध्ये यवतमाळच्या पालकमंत्री पदाची धुराही त्यांच्याकडे होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाच्या माध्यमातून विदर्भातील एकमेव मंत्री म्हणूनही राठोड यांनी काम पाहिले.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जिल्ह्यातील सर्वांच्याच नजरा राठोड यांच्या भूमिकेकडे लागल्या होत्या. बंडखोर आमदारांनी सूरत गाठल्यानंतर राठोड यांंचे नाव चर्चेत आले. मात्र, शिवसेनेच्या बैठकीला ते ‘मातोश्री’वर उपस्थित होते. त्यामुळे राठोड यांची नेमकी भूमिका काय याबद्दल संभ्रम निर्माण झालेला असतानाच गुरुवारी ते आमदार दादा भुसे यांच्यासोबत गुवाहाटीकडे रवाना झाले. रात्री ९.३० च्या सुमारास संजय राठोड यांच्यासह दादा भुसे आणि रवींद्र फाटक गुवाहाटीत पोहोचल्याचेही सांगण्यात आले.
अनेक पदाधिकारी शोधत आहेत संकटात संधी
- अनेक आमदारांनी सेनेची साथ सोडली असली तरी जमिनीवरील शिवसैनिक आजही सेनेसोबत आहे आणि हीच उद्धव ठाकरे यांची ताकद आहे. केवळ आमदार- खासदार म्हणजे पक्ष नसतो तर संघटनेमागे अस्मिता, विचार, जनाधार असावा लागतो. त्यामुळे नेते संपले तरी संघटना संपत नाही. अनेक मतदारसंघात शिवसेनेकडे दुसऱ्या फळीतील तगडे कार्यकर्ते आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही शिवसेनेची पाळेमुळे घट्ट असून अनेक पदाधिकारी मागील १५-२० वर्षांपासून निष्ठेने सेनेचे काम करत आहेत. आमदार-खासदारांसारखे ज्येष्ठ नेते बाहेर पडत असताना या निष्ठावंत शिवसैनिकांना संधी खुणावत आहे. त्यामुळेच पुढील काळात जिल्ह्यात पुन्हा सेनेला बळकटी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलणार
- जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले संजय राठोड एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेल्याने याचा जिल्ह्याच्या राजकारणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. दारव्हा-दिग्रस मतदारसंघातून निवडून आलेल्या संजय राठोड यांचे या मतदारसंघावर एकहाती प्राबल्य आहे. तेथे काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे वसंत घुईखेडकर, अपक्ष संजय देशमुख यांच्याशी त्यांचा सामना होतो. दारव्हा-दिग्रस या दोन्ही तालुक्यांतील शिवसैनिक मोठ्या संख्येने राठोड यांच्यासोबत जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेला नव्याने बांधणी करावी लागेल.