शिवसेनेत ‘पोस्टर वॉर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 09:44 PM2018-07-27T21:44:26+5:302018-07-27T21:45:03+5:30
जिल्हा शिवसेनेत नेत्यांमधील गटबाजीमुळे ‘पोस्टर वॉर’ सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा व जनतेचे मनोरंजन होत असले तरी शिवसेनेचा तळागाळातील प्रामाणिक कार्यकर्ता मात्र अस्वस्थ असल्याचे पहायला मिळत आहे.
राजेश निस्ताने।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा शिवसेनेत नेत्यांमधील गटबाजीमुळे ‘पोस्टर वॉर’ सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा व जनतेचे मनोरंजन होत असले तरी शिवसेनेचा तळागाळातील प्रामाणिक कार्यकर्ता मात्र अस्वस्थ असल्याचे पहायला मिळत आहे.
महसूल राज्यमंत्री संजय राठोड व खासदार भावना गवळी या कधीकाळी शिवसेनेची पश्चिम विदर्भातील मोठी ताकद म्हणून ओळखल्या जात होत्या. परंतु जिल्हा प्रमुखाच्या नियुक्तीवरून त्यांच्यात बिनसले. तेथून सुरू झालेला हा वाद आता चांगलाच टोकाला पोहोचला आहे. ‘मातोश्री’पासून सर्वांनीच तडजोडीचे प्रयत्न करून पाहिले. मात्र तेथे होय म्हणणारे हे नेते प्रत्यक्षात जिल्ह्यात आल्यावर मात्र एकमेकांच्या विरोधात समर्थकांसह उभे ठाकतात. अलिकडे त्यांच्यातील ही भांडणे मिटण्याची आशा जवळजवळ मावळली आहे. दोन्ही नेत्यांनी आता एकमेकांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. निवडणुकीतील संभाव्य परिणामांचा विचार न करता ही नेते मंडळी एकमेकांना पाहून घेण्याचे संकेत देत आहेत. त्यातूनच त्यांच्यात प्रचंड ‘पोस्टर वॉर’ सुरू झाले आहे.
तार्इंच्या फ्लेक्सवरून भाऊ बाद
२७ जुलै रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. या निमित्त यवतमाळ व वाशिम लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शेकडोच्या संख्येने फ्लेक्स लावण्यात आले. मात्र ते लावताना गवळी गटाने राठोड गटासाठी कुठेही जागा शिल्लक राहणार नाही, अशा पद्धतीने नियोजन केले होते. यवतमाळ शहरच नव्हे तर राठोडांच्या दिग्रस-दारव्हा मतदारसंघातही मोक्क्याच्या जागा गवळींच्या फ्लेक्सने आधीच आरक्षित केल्या होत्या. विशेष असे गवळींनी लावलेल्या या फ्लेक्सवरून संजय राठोड यांना पूर्णत: बाद करण्यात आले. कोणत्याही फ्लेक्सवर चुकूनही राठोडांचा फोटो दिसणार नाही, याची खबरदारी गवळी समर्थकांनी घेतली.
म्हणे, हिशेब चुकता केला
२३ जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमाचा हा हिशेब चुकता केला गेल्याचे गवळी समर्थक सांगत आहे. त्यावेळी भावना गवळींचे फ्लेक्स लावायला जागा मिळणार नाही, अशी खेळी राठोड समर्थकांकडून खेळली गेली होती. त्याचीच पुनरावृत्ती ‘जशास तसे’चा परिचय देत यावेळी गवळी समर्थकांनी खेळल्याचे दिसून येते. २३ जानेवारीला राठोड व गवळी यांनी महाआरोग्य शिबिरेही वेगवेगळी घेतली होती.
वर्चस्वाची लढाई विकोपाला
शिवसेनेचे दैवत असलेल्या बाळासाहेब ठाकरेंची जयंती व खुद्द पक्ष प्रमुखांच्या वाढदिवसाच्या फ्लेक्सवरूनही शक्तीप्रदर्शनाची कोणतीही संधी सोडली जात नाही. यावरून या नेत्यांमधील वाद व वर्चस्वाची लढाई किती विकोपाला गेली आहे, याचा सहज अंदाज येतो. नेत्यांच्या या भांडणाचा काही कार्यकर्ते मात्र वेगळाच लाभ उठवित आहे. कालपर्यंत पर्याय नसल्याने राठोडांना विरोध असूनही त्यांच्या सोबत दिसणारे कार्यकर्ते आता भावना गवळींच्या गटात दाखल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तर काही कार्यकर्ते दोनही तबले वाजविताना दिसत आहेत.
नेत्यांच्या भांडणात शिवसैनिक घरात
कायम पक्ष हे दैवत मानणारा सामान्य शिवसैनिक मात्र नेत्यांच्या या भांडणावर नाराज आहे. कुणालाच राग लोभ नको म्हणून अनेक शिवसैनिकांनी घरात राहणे पसंत केले आहे. त्यांची हीच भूमिका आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास पक्षाला मोठा धोका संभवतो. म्हणूनच अजूनही वेळ गेलेली नाही, नेत्यांनी समझोता करावा, अशी या निष्ठावंत शिवसैनिकांची भावना आहे.
तीनही सामने गवळींनी जिंकले
संजय राठोड व पर्यायाने बंजारा समाजाशी उघड शत्रुत्व पत्करणाऱ्या खासदार भावना गवळींच्या गोटात मात्र फारसे चिंतेचे वातावरण दिसत नाही. यापूर्वीसुद्धा तीन वेळा बंजारा समाज विरुद्ध मराठा समाज अशा उघड निवडणुका झाल्या. त्यात गवळी परिवाराची सरशी झाल्याची उदाहरणे त्यांच्या समर्थकांकडून दिली जात आहे. एकदा सुधाकरराव नाईकांना पुंडलिकराव गवळींनी पराभूत केले. तर त्यानंतरच्या दोन निवडणुकांमध्ये मनोहरराव नाईक व हरिभाऊ राठोड यांना भावना गवळींनी पराभूत केल्याचे गवळी समर्थक सांगत आहे. त्यावर त्यावेळी संजय राठोड यांची ताकद शिवसेनेच्या सोबत होती हे गवळी समर्थक विसरत असल्याचे प्रत्युत्तर राठोड समर्थकांकडून दिले जात आहे.
मतदार विभागणार, पक्षाला नुकसान
भावना गवळी व संजय राठोड यांच्यात या पक्षांतर्गत वादामुळे यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील बंजारा व कुणबी-मराठा मतदार विभागले जाण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास शिवसेनेला नुकसान होऊ शकते. या वादामुळे एखादवेळी शिवसेनेची लोकसभेची जागा हातची जाऊ शकते. स्ट्राँग पर्याय भेटल्यास दिग्रस-दारव्हा विधानसभेतही असेच नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या पक्षाने सर्व काही दिले, किमान पक्षाचे हीत डोळ्यापुढे ठेऊन तरी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे, अशी सामान्य शिवसैनिकांची भावना आहे. किमान निवडणुकीपर्यंत तरी नेत्यांनी जुळवून घ्यावे, असा शिवसैनिकांचा सूर आहे.
लोकसभा, दिग्रस विधानसभेत काँग्रेसला संधी
शिवसेना नेत्यांमधील या भांडणाचा फायदा काँग्रेसला निश्चीतच होऊ शकतो. या भांडणाच्या निमित्ताने काँग्रेसला आयतीच संधी चालू आल्याचे मानले जाते. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात नेत्यांमधील गटबाजीमुळे बंजारा समाज भावना गवळींच्या विरोधात जाण्याची तर दिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघात कुणबी-मराठा मतदार संजय राठोड यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या दोघांनाही नुकसान होऊन काँग्रेसला फायदा होऊ शकतो. मात्र काँग्रेसला त्यासाठी विधानसभेत डमी उमेदवार देण्याची परंपरा यावेळी खंडित करावी लागेल.