शिवा, पवनपुत्र, चंचलकली, हिमालय राळेगावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 22:18 IST2018-12-22T22:18:00+5:302018-12-22T22:18:32+5:30
राळेगाव वनपरिक्षेत्रात दहशत माजविणाऱ्या टी-१ वाघिणीच्या दोन बछड्यांना पकडण्यासाठी मध्यप्रदेशातील कान्हा अभयारण्यातील चार हत्ती पांढरकवडाच्या लोणी परिसरात मंगळवारी दाखल झालेत.

शिवा, पवनपुत्र, चंचलकली, हिमालय राळेगावात
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : राळेगाव वनपरिक्षेत्रात दहशत माजविणाऱ्या टी-१ वाघिणीच्या दोन बछड्यांना पकडण्यासाठी मध्यप्रदेशातील कान्हा अभयारण्यातील चार हत्ती पांढरकवडाच्या लोणी परिसरात मंगळवारी दाखल झालेत. या हत्तीच्या मदतीने वनविभागाचे पथक वाघिणीच्या बछड्यांचा शोध घेत असून एका बछड्याला जेरबंद करण्यात शनिवारी यश आले. शिवा, पवनपुत्र, चंचलकली, हिमालय अशी या हत्तींची नावे आहेत.
पांढरकवडा राळेगाव, आणि कळंब या तीन तालुक्यात टी-१ या नरभक्षक वाघिणीला बोराटी येथील नाल्यात ठार केले. ही कारवाई २ नोव्हेंबरला रात्री केली. त्यानंतर या वाघिणीच्या बछड्यांचा विषय ऐरणीवर आला. त्यांच्या शोधासाठी वन विभागाने वनपरिक्षेत्रात शोधमोहीम सुरूच ठेवली. परंतु बछड्यांचा शोध लागला नाही. अखेर वन विभागाने मध्यप्रदेशातील कान्हा अभयारण्यातील चार हत्तींना पाचारण केले. या चार प्रशिक्षित गजराजांची फौज लोणी येथे माहुतासह वनकर्मचाºयांच्या मदतीला आली आहे. हे चार गजराज जंगलातून गस्त करीत असताना रस्ता स्वत: बनवतात. एकमेकांशी व माहुताशी सांकेतीक भाषेत संवाद साधून वाघीणीच्या बछड्यांचा व वाघाचा गंध घेत वाटचाल करतात. जर त्यांना वाघ किंवा बछडयांचे लोकेशन मिळाले तर दोनशे मीटरचा घेराघालून त्या जनावरास जागीच खिळवून ठेवण्याची त्यांची पद्धत आहे. जेणे करून हत्तीवरील डॉक्टर व शार्प शुटर यांना बछडयाला डॉट करणे सोईचे होईल. व ही मोहिम लवकरात लवकर फत्ते होईल, असे उपवनसंरक्षक के. अभर्णा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या मोहिमेत यावेळी वन विभागाच्या अधिकाºयांसह वैद्यकीय अधिकारी सोबत आहे. एका बछड्याला शनिवारी बेशुद्ध करून पकडण्यात आले. आता अन्य एक बछडा व वाघ यांना जेरबंद करण्याचे आव्हान वनविभागापुढे आहे.