शिवचरित्रावर आधारित सामान्यज्ञान परीक्षा
By Admin | Published: February 15, 2017 02:52 AM2017-02-15T02:52:29+5:302017-02-15T02:52:29+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८७ व्या जयंतीनिमित्त शिवचरित्रावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
पुसद येथे आयोजन : सहा हजार विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग
पुसद : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८७ व्या जयंतीनिमित्त शिवचरित्रावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आठ केंद्रांवर सहा हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. इयता चार ते सातच्या अ गट तर आठ ते पदवीच्या ब गट अशा दोन गटात ही परीक्षा घेण्यात आली.
कोषटवार (दौ) विद्यालय, गुणवंतराव देशमुख विद्यालय, शिवाजी विद्यालय, मातोश्री विद्यालय, एमपीएन कॉन्व्हेंट, ज्योतीर्गमय स्कूल, मुंगसाजी विद्यालय व लोकहित विद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली. शहरातील विविध सामाजिक संघटना प्रमुख, पदाधिकारी, संस्थाप्रमुख, नगरसेवक, छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते आदींनी पुढाकार घेतला. विविध जाती धर्माच्या शिक्षक व शिवप्रेमी बंधू भगिनींनी दिलेले योगदान अभिमानास्पद होते. पुसदच्या इतिहासातील पहिलीच इतक्या मोठ्या प्रमाणात असलेली शिवचारित्र्यावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा यशस्वीरीत्या झाली. शाळांमध्ये, शाळांतील वाचनायलातील छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तके, वाचन साहित्य, आणि इंटरनेटच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांचा अभ्यास केल्याचे निदर्शनास आले. येत्या १९ तारखेला शिवजयंती दिनी या परीक्षेचे विजेते घोषित केल्या जाणार आहेत. दरम्यान डॉ आनंद मुखरे, श्रीकांत सरनाईक शिक्षण विभागाचे प्रकाश घोडेकर, साखरे, दिगंबर जगताप आदींनी केंद्राला भेटी दिल्या. विजेत्यांना रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या निमित्ताने शहरातील सर्वच वाचनालयात शिवचरित्रावर आधारित पुस्तकांची मागणी वाढली होती. सर्व संस्था प्रमुख व कॉमर्स अकादमी, स्टुडंट एजुकेशनल अकादमीच्या सहकार्याने या परीक्षेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजक अजय क्षीरसागर, परीक्षा संयोजक चंद्रकांत ठेंगे, कौस्तुभ धुमाळे यांनी सांगितले. या निमित्ताने बालवयात विदयार्थ्यांनी शिवचरित्र वाचावे व त्या पासून प्रेरणा घ्यावी या हेतुने हे आयोजन करण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)