जातीय समीकरणामुळे शिवसेनेला घाम फुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 10:04 PM2018-12-05T22:04:16+5:302018-12-05T22:04:54+5:30
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना जवळपास पक्षाने जात या बाबीला प्राधान्य दिले. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे याच बाबीचा आधार घेत मतदारांना आकर्षित केले जात आहे. हा फंडा कितपत यशस्वी होतो, हे निकालानंतर स्पष्ट होईल.
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना जवळपास पक्षाने जात या बाबीला प्राधान्य दिले. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे याच बाबीचा आधार घेत मतदारांना आकर्षित केले जात आहे. हा फंडा कितपत यशस्वी होतो, हे निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र जातीय समीकरणे यशस्वी होण्याची शक्यता वाढल्यास या निवडणुकीत शिवसेनेला घाम गाळावा लागेल, असे आजचे चित्र आहे.
या निवडणुकीत बंडखोरांची गर्दी वाढली आहे. प्रत्येक प्रभागात अपक्षांनी अधिकृत उमेदवारांच्या तोंडाला फेस आणला आहे. बंडखोरांमुळे मतांची विभागणी होऊन त्याचा परिणाम निकालावर होईल, असे चित्र आहे. प्रभाग-१ अ मध्ये तिहेरी, तर ब मध्ये दुहेरी लढत होत आहे. प्रभाग-२ अ मध्ये दुहेरी लढतीचे चित्र आहे, तर ब मध्ये अपक्षाचा जोर दिसत आहे. या प्रभागात शिवसेनेचे सर्वाधिक बंडखोर रिंगणात असल्याने काँग्रेसला फायदा होऊ शकतो.
प्रभाग क्र.३ अ मध्ये तिहेरी लढतीचे चित्र आहे. या प्रभागात काँग्रेसच्या बंडखोरांमुळे सरळ फायदा शिवसेनेला होऊ शकतो. प्रभाग ३ ब मध्ये अपक्षांसह तिहेरी लढतीचे चित्र आहे. प्रभाग-४ अ मध्ये एकतर्फी लढतीची शक्यता आहे, तर ब मध्ये तिहेरी लढत होत आहे.
प्रभाग-५ अ मध्ये प्रहार व मनसेही प्रभावी ठरत आहे, तर ब मध्ये दुहेरी लढत होत आहे. प्रभाग-६ अ मध्ये अपक्ष लढतीत राहू शकतो, तर ब मध्ये दुहेरी लढत होत आहे. या प्रभागात अपक्षाचाही बोलबाला असल्याने विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे निकालानंतर स्पष्ट होईल. प्रभाग-७ अ मध्ये थेट लढत होत आहे. ब मध्ये दुहेरी लढत आहे. प्रभाग क्र.८ अ मध्ये तिहेरी लढतीचे चित्र आहे. प्रभाग-८ ब ला सर्वात जास्त बंडखोरांनी पोखरल्याने यात तिहेरी लढतीचे चित्र आहे. प्रभाग-९ अ मध्ये रिपाइं लढतीत दिसत आहे, तर ब मध्ये तिहेरी लढत होत आहे. या निवडणुकीत अपक्ष निकाल फिरवू शकतात, बंडखोरांमुळे पक्षाला धक्का पोहोचू शकतो, हे १० डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.
अंतर्गत वादात उमेदवार अडचणीत
राजकीय पक्षातील अंतर्गत वादही अधिकृत उमेदवारांसाठी अडचणीचा ठरत आहे. एका गटाचे कार्यकर्ते दुसऱ्या गटासाठी प्रचारकार्य करीत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. काहींनी अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. उमेदवारी नाकारल्याचा वचपाही काढण्याच्या तयारीत काहीजण आहेत. निवडून येण्याची पूर्ण क्षमता असतानाही काही लोकांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे अशा काही लोकांनीही पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी रणनिती आखणे सुरू केले आहे. पैशाचाही वापर या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.