शिवसेनेचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 09:59 PM2018-08-01T21:59:42+5:302018-08-01T22:00:34+5:30
शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुखावरील गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. टिळकस्मारक भवन येथून मंगळवारी दुपारी निघालेला हा मोर्चा दत्त चौक, बसस्थानक चौक मार्गे एलआयसी चौकात धडकला. येथे झालेल्या सभेत पालकमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुखावरील गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. टिळकस्मारक भवन येथून मंगळवारी दुपारी निघालेला हा मोर्चा दत्त चौक, बसस्थानक चौक मार्गे एलआयसी चौकात धडकला. येथे झालेल्या सभेत पालकमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. नंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
कामगार नोंदणी कार्यालयात शिवसेनेचे संतोष ढवळे यांनी गोंधळ घालून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याची तक्रार शहर ठाण्यात नोंदविण्यात आली. यानंतर ढवळे यांना मंगळवारी अटक झाली. या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने मोर्चाचे आयोजन केले होते. तालुक्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले.
संतोष ढवळे यांच्यावर पालकमंत्री मदन येरावार यांच्या सांगण्यावरून खोटे गुन्हे नोंदविण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. ढवळे हे निर्दोष असून त्यांनी खºया कामगारांना हक्क मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र पालकमंत्र्यांकडून राजकारण केले जात असून भाजपाच्या ठराविक कार्यकर्त्यांंनाच या योजनेचा लाभ दिला जात आहे. हा मनसुबा उधळण्याचा प्रयत्न केल्यानेच ढवळे यांना तुरुंगात जावे लागल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.
ढवळे यांच्यावरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिले. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, पराग पिंगळे, निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, उमाकांत पापीनवार, किशोर इंगळे, श्रीधर मोहोड, शहर प्रमुख पिंटू बांगर, एकनाथ तुमकर, पंचायत समितीचे उपसभापती गजानन पाटील, संजय रंगे, हरिभाऊ लिंगणवार, गजानन बेजंकीवार, राजेश टेंभरे यांनी केले.
माफिया राज मोडण्याचे आव्हान
पालकमंत्र्यांच्या पाठबळाने शहरासह जिल्ह्यात माफियाराज बोकाळले आहे. पालकमंत्री सामाजिक कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी सत्तेचा वापर करीत आह, असा आरोप करीत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी किमान पोलिसांनी माफियांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी केली.