गोंदियातील शिवशाही अद्याप आगारातच उभी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 05:00 AM2022-04-11T05:00:00+5:302022-04-11T05:00:06+5:30

जिल्ह्यात गोंदिया आगाराकडे शिवनेरी नसून ४ शिवशाही आहेत. मात्र, महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्याही बंद पडून आहेत. शिवशाही चालविण्यासाठी आगारातील प्रशिक्षित चालकांची गरज असते. मात्र, आगारातील प्रशिक्षित चालक आंदोलनात असल्याने कंत्राटी चालकांच्या हाती बसेसचे स्टेअरिंग आले आहे. त्यामुळे त्यांना शिवशाही देता येत नसल्याने शिवशाही आगारातच आहे.

Shivshahi in Gondia is still standing in the depot | गोंदियातील शिवशाही अद्याप आगारातच उभी

गोंदियातील शिवशाही अद्याप आगारातच उभी

googlenewsNext

कपिल केकत 
लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया : उन्हाळा आता आपल्या रंगात आला असून, तापमान ४१ अंश सेल्सिअसवर जात आहे. अशात घराबाहेर पडणे कठीण होत असताना प्रवास करायचा म्हणताच अंगाला घाम फुटत आहे. 
उन्हाळ्याच्या दिवसांत प्रवास करणे म्हणजे जिकरीचे राहत असून, त्यातही साध्या बसने प्रवास म्हणताच धडकी भरती. अशात थोडेफार जास्त पैसे का लागेना, मात्र एसी गाड्यांची तिकीट घेऊन प्रवास करण्याला नागरिकांची जास्त पसंती असते. बसेसमध्ये एसीतील प्रवासासाठी शिवनेरी व शिवशाही या बसेस पर्याय आहेत. 
जिल्ह्यात गोंदिया आगाराकडे शिवनेरी नसून ४ शिवशाही आहेत. मात्र, महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्याही बंद पडून आहेत. शिवशाही चालविण्यासाठी आगारातील प्रशिक्षित चालकांची गरज असते. मात्र, आगारातील प्रशिक्षित चालक आंदोलनात असल्याने कंत्राटी चालकांच्या हाती बसेसचे स्टेअरिंग आले आहे. त्यामुळे त्यांना शिवशाही देता येत नसल्याने शिवशाही आगारातच आहे. एसी असलेली आता एकही बस नसल्याने प्रवाशांना मात्र साधारण बसमध्ये उकाड्याचा सामना करीत प्रवास करावा लागत आहे. 

एसटीचा दिवसा प्रवास नको रे बाबा 
उष्णतेच्या लाटेमुळे उन्हाची तीव्रता वाढली असून, नागरिकांना घराबाहेर पडताना विचार करावा लागत आहे. त्यात एवढ्या कडक उन्हात एसटीचा प्रवास म्हणताच धडकी भरू लागते. विशेष म्हणजे, शिवशाही नसल्याने प्रवाशांची आणखीच गैरसोय होत असून, दिवसा एसटीचा प्रवास म्हणताच अंगाला घाम फुटत आहे.

४१ अंशावर गेला पारा
जिल्ह्याचा पारा चांगलाच चढला असून, रविवारी पारा ४०.२ अंश सेल्सिअसवर होता. एवढ्या उन्हात प्रवास करणे तेही साध्या बसमध्ये म्हणजे धोक्याचे काम आहे. आता नागरिक एसी वाहनांतून प्रवासाला प्राधान्य देत आहेत. 

शिवशाही आगारातच

- जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा असे दोन आगार आहेत. यातील गोंदिया आगारात ४ शिवशाही असून, तिरोडा आगारात एकही शिवशाही नाही. तर शिवनेरी गोंदिया व तिरोडा या दोन्ही आगारांत नाही. त्यातही महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सध्या प्रशिक्षित चालक आंदोलनात असून, कंत्राटी चालकांच्या भरवशावर फेऱ्या सुरू आहेत. मात्र, त्यांच्या हाती शिवशाही देता येत नसल्याने शिवशाही आगारातच आहे. 

गोंदिया-नागपूर मार्गावर धावते शिवशाही 
जिल्ह्यातील ४ शिवशाही गोंदिया-नागपूर मार्गावरच धावत होत्या. या मार्गावरच त्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. शिवाय प्रवासी वाहतूक या मार्गावर जास्त असल्याने आगाराला चांगले उत्पन्न येत होते. मात्र, शिवशाही बंद असल्यामुळे आगाराचे नुकसान होत असून, सोबतच प्रवाशांची गैरसोय होत आहे. 

 प्रवाशांचा घाम गाळत प्रवास 

- जिल्ह्यात फक्त गोंदिया आगारालाच ४ शिवशाही देण्यात आल्या आहेत. मात्र प्रशिक्षित चालक नसल्यामुळे या शिवशाही त्यांच्या हाती देण्यात आलेल्या नसून आगारातच आहेत. यामुळे मात्र प्रवाशांना साधारण बसेसनेच घाम गाळत प्रवास करावा लागत आहे. 

आगाराकडे ४ शिवशाही असून, एकही शिवनेरी नाही. मात्र, कर्मचारी आंदोलनामुळे आगारात सध्या कंत्राटी चालकांकडून फेऱ्या सुरू आहेत. अशात त्यांच्या हाती शिवशाही देता येत नाही. शिवाय शिवशाही सुरू करण्याबाबत तसे आदेशही आलेले नाहीत. म्हणून शिवशाही बंद आहे. 
- संजना पटले, आगार प्रमुख, गोंदिया 

 

Web Title: Shivshahi in Gondia is still standing in the depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.