दिग्रस बाजार समितीत पालकमंत्री संजय राठोड यांना धक्का; मविआचा डंका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 08:27 PM2023-04-28T20:27:35+5:302023-04-28T20:28:19+5:30
महाविकास आघाडीने जिंकल्या १४ जागा : भाजप-शिंदे गटाला चार जागा
प्रकाश सातघरे
दिग्रस (जि. यवतमाळ) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील बाजार समिती म्हणून या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. पालकमंत्र्यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने १८ पैकी १४ जागा जिंकत आपले वर्चस्व अबाधित राखले. राठोड यांच्या गटाला केवळ चार जागा मिळाल्या आहेत.
दिग्रसमध्ये शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविली. त्यांच्या विरोधात शिवसेना (शिंदे) आणि भाजपने रणशिंग फुंकले होते. दोन्ही गटांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पालकमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात हा तालुका येत असल्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. दुसरीकडे माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. आतापर्यंत बाजार समितीवर देशमुख यांचे एकहाती वर्चस्व कायम होते. ते अबाधित ठेवण्यासाठी देशमुख यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सहकार्याने विजयासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
मतदानानंतर सुरू झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासून महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. या आघाडीचे सहकारी संस्था मतदारसंघातून ११, अडते-व्यापारी मतदारसंघातून दोन आणि हमाल-मापारी मतदारसंघातून एक, असे १४ उमेदवार विजयी झाले. विरोधी पालकमंत्री संजय राठोड यांच्या गटाला ग्रामपंचायत मतदारसंघातील केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले.