भाजीचे ढिगच्या ढिग विकूनही साधे नाश्त्यापुरते पैसे मिळत नाहीत हो; बळीराजा परिस्थितीपुढे हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 05:41 PM2018-03-24T17:41:41+5:302018-03-24T17:41:41+5:30

गेल्या आठवड्यात माहूरच्या बाजारात टोमॅटो विकायला नेले तेव्हा दहा रुपये कॅरेटचा भाव आला. अशी अवस्था इतरही शेतकऱ्यांची आहे.

shocking condition of farmers in maharashtra | भाजीचे ढिगच्या ढिग विकूनही साधे नाश्त्यापुरते पैसे मिळत नाहीत हो; बळीराजा परिस्थितीपुढे हतबल

भाजीचे ढिगच्या ढिग विकूनही साधे नाश्त्यापुरते पैसे मिळत नाहीत हो; बळीराजा परिस्थितीपुढे हतबल

googlenewsNext

ज्ञानेश्वर मुंदे, यवतमाळ : ‘साहेब, घाम गाळून कमी पाण्यात भाजीपाला पिकविला. महागडी मजुरी देऊन तोडणी केली. मार्केटमध्ये विकायला नेले तर फुलकोबीचा २० किलोचा कट्टा ३० रुपयाला. टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेटला ५० रुपये मिळतात. पालक भाजीला कुणी विचारतही नाही. शेतापासून मार्केटपर्यंत भाजीपाला नेण्याचा खर्चही निघत नाही. खरं सांगून साहेब, भाजी विकून शहरात भजे खायलाही पैसे उरत नाहीत’ असे उद्विग्न होऊन महागाव तालुक्यातील गुंजचे नारायण खंदारे सांगत होते. ही एकट्या गुंजच्या शेतकऱ्याची व्यथा नाही, तर सध्या भाजीपाल्याच्या पडलेल्या भावाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हीच अवस्था झाली आहे.

गेल्या तीन-चार महिन्यांपासून दारावर येणारा भाजी विक्रेता दहा रुपयाला दीड किलो टोमॅटो देत आहे. फुलकोबी आणि पालकाचीही असेच दर आहे. सर्व स्वस्ताई जणू भाजीपाल्यावरच आल्याचे दिसत आहे. दारावरचा भाजी विक्रेता दहा रुपयात दीड किलो टोमॅटो विकत असेल तर ज्याच्या शेतात पिकले त्या शेतकऱ्याला काय मिळत असेल, हा मन सुन्न करणारा प्रश्न आहे. भाजी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा उतरलेल्या दरांनी उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे वास्तव पुढे आले. 

गुंज येथीलच अनिल दुपारते म्हणाले, टोमॅटो, वांगे आता कोणी विकतही घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून तर मार्केटमध्ये पायही ठेवला नाही. शेतात जाण्याची इच्छाही होत नाही. दुष्काळी परिस्थितीत भाजीपाल्यातून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तेही आमच्या नशिबी दिसत नाही. विठ्ठल दैत यांनी आमच्यापेक्षा मजूर बरे, भाजीपाला विकूनही काही हातात उरत नाही. घर खर्च कसा चालवावा, मुलांचे शिक्षण कसे करावे, असा सवाल त्यांनी केला. बिजोराचे ज्ञानेश्वर कड यांनी अर्ध्या एकरात मलचिंग पेपर टाकून टोमॅटोची लागवड केली. गेल्या आठवड्यात माहूरच्या बाजारात टोमॅटो विकायला नेले तेव्हा दहा रुपये कॅरेटचा भाव आला. अशी अवस्था इतरही शेतकऱ्यांची आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी यवतमाळ, वर्धा, आर्णी, आदिलाबाद, पांढरकवडा, नागपूर आदी मार्केटमध्ये भाजीपाला विकण्यासाठी नेतात. नारायण खंदारे सांगत होते, यवतमाळपर्यंत नेण्यासाठी टोमॅटोच्या कॅरेटमागे ३५ रुपये खर्च येतो. तेथे गेल्यावर ५०  रुपये कॅरेट प्रमाणे हाती येतात. वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याचे अनेक शेतकरी सांगत होते.   

भाजीपाला उत्पादनात एकरी २० हजार तोटा
महागाव तालुक्यातील गुंज हे जिल्ह्यातील सर्वाधिक भाजीपाला पिकविणारे गाव. भाजीपाल्यातूनच अनेक घरात समृद्धी आली. परंतु यंदा या शेतकºयांना आपल्या भाजीपाल्याच्या शेतात गुरे सोडण्याची वेळ आली. प्रकाश खंदारे सांगत होते, फुलकोबी शेतातच सडत आहे. टोमॅटो काढायला मजुरी परवडत नाही. मशागतीपासून तर विक्रीपर्यंतचा हिशेब लावला तेव्हा प्रती एकर २० हजार रुपयाने आम्ही तोट्यात आलो. टोमॅटोच्या एक एकर शेतीच्या मशागतीसाठी पाच हजार रुपये, बियाण्यांसाठी पाच ते सात हजार रुपये, टोमॅटोची झाडे सुतळीने बांधण्यासाठी चार हजार रुपये खर्च, फवारणीसाठी तीन हजार रुपये आणि माल तोडण्यासाठी एकरी पाच हजार रुपये खर्च येतो. एवढे करूनही बाजारात टोमॅटोचे कॅरेट ३० ते ३५ रुपयाला जात असेल तर जगायचे कसे असा सवाल त्यांनी केला. 

मराठवाड्यातून वाढली आवक 
यवतमाळच्या भाजी बाजारात फेरफटका मारला तेव्हा मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेऊन आलेली वाहने दिसत होती. मराठवाड्यात गत महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीतून बचावलेला हा माल कवडीमोल भावात शेतकरी विकत आहेत. जो माल मे महिन्यात निघायचा तो वातावरणातील बदलाने मार्चमध्येच निघत आहे. परिणामी स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला उठावच नाही.

Web Title: shocking condition of farmers in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.