धक्कादायक! यवतमाळातील रुग्ण नागपुरात पळविण्यासाठी रुग्णवाहिका चालकांसोबत डिलिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 01:45 PM2018-07-14T13:45:01+5:302018-07-14T13:46:09+5:30
वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिक स्पर्धा वाढली असून ग्रामीण भागातील रुग्ण मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये भक्ष्य बनविले जात आहे. अधिकाधिक रुग्ण मिळावे म्हणून या मल्टीस्पेशालिटींनी आता रुग्णांची पळवापळवी सुरु केली आहे.
सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिक स्पर्धा वाढली असून ग्रामीण भागातील रुग्ण मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये भक्ष्य बनविले जात आहे. अधिकाधिक रुग्ण मिळावे म्हणून या मल्टीस्पेशालिटींनी आता रुग्णांची पळवापळवी सुरु केली आहे. रुग्णवाहिका चालकांशी टक्केवारीचे गणित जुळवून डिलिंग केले जाते. अशीच एक डिलिंग यवतमाळनजीकच्या बुधवारी सामिष पार्टी देऊन करण्यात आली. यात नागपूरच्या काही मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलने पुढाकार घेतला होता.
नागपूरसह महानगरात मोठमोठे खासगी रुग्णालय उदयास आले. एकाच छत्राखाली सर्व सुविधा दिली जाते. बहुतांश ठिकाणी व्यवसायासोबतच वैद्यकीय नितीमत्ता जोपासली जाते. परंतु काहींनी केवळ व्यवसायिकतेला प्राधान्य देत रुग्ण मिळविण्याचा गोरखधंदा सुरु केला आहे. जिल्हास्तरावरील शासकीय रुग्णालयात येणाऱ्या ग्रामीण रुग्णाला हेरण्यात येते. यासाठी रुग्णवाहिका चालकांचा उपयोग केला जात आहे. जिल्हास्तरावरून अधिक उपचारासाठी मल्टीस्पेशालिटीत जाण्याचा सल्ला दिला की रुग्णवाहिकेशिवाय पर्याय नसतो. हीेच नस पकडून मल्टीस्पेशालिटींनी रुग्णवाहिका चालकांना टार्गेट दिले आहे. रुग्णाला आपल्या रुग्णालयात घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला उपचार खर्चाच्या बिलावर थेट कमिशन दिले जाते. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील रुग्ण पळविण्याची स्पर्धा दिसून येते.
यवतमाळातील रुग्णवाहिका चालकांशी वाटाघाटी करण्यात आल्या. यासाठी नागपुरच्या स्पेशालिटीतील ‘एकजण ’ मोठी आॅफर घेऊन यवतमाळात दाखल झाला. डिलिंगसाठी जागा निवडण्यात आली. यवतमाळ मेडिकल आवारातील एका ज्येष्ठ रुग्णसेवकामार्फत हे डिलिंग पूर्ण करण्यात आले. यापूर्वी मल्टीस्पेशालिटीकडून थेट मेडिकलमध्ये कार्यरत सीएमओंनासुद्धा (कॅज्युलीटी) कमिशन दिले जात होते. यासाठी ‘रेफर टू’ उपचारपद्धती अवलंबिणे हीच एक अट होती. मात्र आता यवतमाळ मेडिकलच्या अधिष्ठात्यांनी ही चेन मोडीत काढली. मात्र त्यावर तोड म्हणून आता रुग्णवाहिका चालकांशी हातमिळवणी करण्यात आली. ही बैठक चार तास रंगली. स्पेशल ट्रिटमेंट देऊन ही टिम नागपूरला परत गेली.