धक्कादायक ! मुलाच्या मारेकऱ्याला दोन वर्षांनंतर बापाने संपविले; आर्णी येथील हत्याकांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 21:21 IST2025-03-29T21:20:02+5:302025-03-29T21:21:55+5:30

पाळत ठेवून तलवारीने केले वार

Shocking! Father kills son's killer two years later; Arni murder case | धक्कादायक ! मुलाच्या मारेकऱ्याला दोन वर्षांनंतर बापाने संपविले; आर्णी येथील हत्याकांड

धक्कादायक ! मुलाच्या मारेकऱ्याला दोन वर्षांनंतर बापाने संपविले; आर्णी येथील हत्याकांड

आर्णी (यवतमाळ) : शहरात दोन वर्षांपूर्वी दुर्गा विसर्जन मिरवणुकीत क्षुल्लक कारणावरून दोघांनी युवकाचा खून केला. या घटनेनंतर  मुलाला गमावलेल्या बापाच्या मनात सुडाचा अग्नी पेटत होता. मुलाचा मारेकरी न्यायालयाच्या तारखेसाठी आर्णी शहरात आल्याची माहिती मिळताच त्याने पाठलाग सुरू केला. संधी मिळाल्यानंतर शहरातील एका शाळेसमोर तलवारीने हल्ला करून मुलाच्या मारेकऱ्याला ठार केले. हा थरार शनिवारी सायंकाळी ७ वाजता घडला.

ओम गजानन बुटले (२५) असे मृताचे नाव आहे. ओमने दोन वर्षांपूर्वी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत वाद घालून अजय अवधूत तिगलवाड (२२, रा. कोळवन) या युवकाचा खून केला होता. त्यानंतर ओम जामिनावर बाहेर आला होता.  मुलाचा कुठलेही कारण नसताना हकनाक बळी घेतला. याची खंत अजयचे वडील अवधूत सूर्यभान तिगलवाड (५०) यांना होती. मुलाच्या मारेकऱ्याला सोडायचे नाही, या मानसिकतेतून अवधूत ओमच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. शुक्रवारी ओमची न्यायालयात तारीख असल्याने तो आर्णी शहरात आला होता.

पुणे येथे जाण्याच्या बेतात असतानाच हल्ला

शनिवारी सायंकाळी तो पुणे येथे जाण्यासाठी सनराईज शाळेसमोर उभा होता. याच संधीचा फायदा घेऊन अवधूत तिगलवाड याने ओमवर तलवारीने वार केले. ओम जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून यवतमाळ येथे हलविण्यात आले. प्रवासादरम्यानच ओमचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी काही तासांतच अवधूत तिगलवाड याला अटक केली. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रजनिकांत चिलुमुला, आर्णी ठाणेदार सुनील नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणात इतरही तिघांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.

Web Title: Shocking! Father kills son's killer two years later; Arni murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.