धक्कादायक! यवतमाळ जिल्ह्यातील महागावच्या कोविड सेंटरमध्ये रंगली ओली पार्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 05:04 PM2020-06-09T17:04:35+5:302020-06-09T17:11:53+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील महागावच्या कोविड सेंटरमध्ये ५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्याचा जल्लोष सेंटरमध्येच करण्यात आला. यावेळी अंगावर घालायच्या कापडांमध्ये गुंडाळून दारू आणण्यात आली. त्यानंतर डान्स करण्यात आला.

Shocking! Party at Kovid Center in Mahagaon in Yavatmal district | धक्कादायक! यवतमाळ जिल्ह्यातील महागावच्या कोविड सेंटरमध्ये रंगली ओली पार्टी

धक्कादायक! यवतमाळ जिल्ह्यातील महागावच्या कोविड सेंटरमध्ये रंगली ओली पार्टी

googlenewsNext
ठळक मुद्देअहवाल निगेटिव्ह आल्याचा आनंदडान्सचा व्हिडिओ व्हायरलजिल्हाधिकारी संतापले


लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याच्या महागाव येथील कोविड सेंटरमध्ये अहवाल निगेटिव्ह आल्याचा आनंद साजरा करताना दारू-मटणाची ओली पार्टी झाली. यावेळी या रुग्णांनी केलेल्या झिंगाट डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महागाव ठाणेदारांना दिले आहे.
महागाव येथील एका सुवर्णकाराचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. त्यामुळे त्याची पत्नी, मुली, नातेवाईक व संपर्कात आलेल्या सुवर्णकार बांधव व इतरांना महागावच्या कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. तेथे आवश्यक सोयीसुविधा मिळत नसल्याची ओरड झाल्याने या रुग्णांना घरून डबा आणण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र त्याचाच त्यांनी गैरफायदा उचलला. दोन दिवसांपूर्वी मृताच्या संपर्कातील ५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्याचा जल्लोष मात्र कोविड सेंटरमध्येच करण्यात आला. यावेळी अंगावर घालायच्या कापडांमध्ये गुंडाळून दारू, तर घरच्या डब्यातून मटण आणण्यात आले. त्यावर ओली पार्टी रंगली. त्यानंतर कोविड सेंटरमध्ये झिंगाट डान्स करण्यात आला. या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह स्वत: महागावात दाखल झाले. त्यांनी कोविड सेंटरला भेट दिली. तुम्हाला सर्व सोयीसुविधा मिळतात का, असे विचारले असता निगेटिव्ह अहवाल आलेल्यांनी आम्हाला दारू, गुटखाही मिळतो असे सांगितले. यामुळे जिल्हाधिकारी आणखीच संतापले. त्यांनी उपस्थित ठाणेदाराला पार्टी व डान्स करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

महसूल किंवा आरोग्य प्रशासनाकडून तक्रारीची प्रतीक्षा आहे. ही तक्रार प्राप्त होताच कोविड सेंटरमधील संबंधितांविरूद्ध गुन्हे दाखल केले जातील.
- दामोधर राठोड, ठाणेदार, महागाव

आरोग्य अधिकाऱ्यांसोबत बोलून यासंबंधी योग्य ती कारवाई केली जाईल. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कालच दिले आहे.
- नीलेश मडके, तहसीलदार, महागाव

डान्सच्या त्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात चौकशी करून तातडीने योग्य ती कारवाई केली जाईल.
- स्वप्नील कापडनीस, एसडीओ, उमरखेड

महसूल, आरोग्य व पोलीस यांच्या संयुक्त अधिपत्याखाली हे कोविड सेंटर आहे. माझा त्यात कुठलाही इंटरेस्ट नाही. कोण व्हिडिओ काढतो, कोण व्हायरल करतो याची मला कल्पना नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली असून कारवाईचे आदेश दिले आहे.
- डॉ. जब्बार पठाण, तालुका आरोग्य अधिकारी, महागाव

Web Title: Shocking! Party at Kovid Center in Mahagaon in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.