धक्कादायक वास्तव; घरातील स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून ६० कुटुंबांनी सोडले गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 07:00 AM2022-03-29T07:00:00+5:302022-03-29T07:00:01+5:30
Yawatmal News अनन्वित अत्याचाराला कंटाळून ६० पारधी कुटुंबीयांना गाव सोडून पलायन करावे लागले. ते सर्वजण मुला-बाळांसह गेल्या महिनाभरापासून जंगलात जीव मुठीत घेऊन राहत आहेत.
अविनाश साबापुरे
यवतमाळ : जग चंद्रावर वस्ती करण्याच्या बाता मारत आहे, तर दुसरीकडे अजूनही काही जणांना जातीच्या जोखडात जखडून त्यांचा छळ केला जात आहे. पारधी समाजाच्या महिलांवर भरदिवसा, तर कधी रात्री अपरात्री लैंगिक अत्याचार होत आहेत. याच अनन्वित अत्याचाराला कंटाळून ६० पारधी कुटुंबीयांना गाव सोडून पलायन करावे लागले. ते सर्वजण मुला-बाळांसह गेल्या महिनाभरापासून जंगलात जीव मुठीत घेऊन राहत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्याच्या माळवाकद गावात हा प्रकार उघडकीस आला. येथे वर्षानुवर्षांपासून अनेक पारधी समाज बांधव वास्तव्यास आहेत. सामाजिक आरक्षणामुळे मागील वेळी येथे पारधी समाजाच्या एका तरुणाकडे सरपंचपदही आले होते. मात्र, त्यालाही गावकऱ्यांनी मारहाण केली. गावातील काही दारुड्या नागरिकांचा पारधी महिलांना गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात त्रास सुरू आहे. शेतात जाताना अश्लील टोमणे मारणे, शेतात एकटी महिला पाहून लैंगिक शोषण करणे, विनयभंग करणे, रात्री खाटेवर जाऊन बळजबरी करणे असे प्रकार घडत आहे.
विशेष म्हणजे ही बाब घरातील पुरुषाच्या लक्षात आल्यास सामाजिक प्रथेनुसार घरातूनही त्या स्त्रीला बहिष्कृत केले जाते. अशा काही महिलांनी आत्महत्या केल्याची काही उदाहरणेही येथे घडली आहेत. मात्र, कोणताही आधार नसल्यामुळे पारधी समाज बांधव हा अन्याय सहन करीत राहिले. शेवटी महिनाभरापूर्वी या लोकांनी गावच सोडून दोन किलोमीटरवर जंगलात एका पाझर तलावाच्या बाजूला आसरा घेतला. मात्र, हा तलावही कोरडा असल्याने आणि या लोकांकडे कुठलाही रोजगार नसल्याने सध्या अन्न-पाण्यावाचून त्यांचे हाल होत आहेत. शेवटी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरतीताई फुपाटे यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पारधी महिलांशी संवाद साधला. त्यावेळी महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची कहाणीच कथन केली.
जिल्हा कचेरीवर धडक
अत्याचाराला कंटाळून तब्बल ६० कुटुंबांना आपले स्वत:चे गाव सोडून महिनाभरापासून जंगलात राहावे लागत आहे. एवढी गंभीर घटना घडूनही जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा संबंधित एसडीओ, तहसीलदारांनी या गावात साधी भेटही दिली नाही. त्यामुळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ प्रदेश महासचिव डॉ. आरतीताई फुपाटे यांनी अन्यायग्रस्त नागरिकांसह सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या संवेदनशील प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून अन्यायग्रस्तांना किमान सोयी-सुविधा तरी पुरवाव्यात, अशी मागणी केली. यावेळी माजी आयुक्त संभाजी सिरकुंडे, तुषार आत्राम, नारायण कऱ्हाळे, भास्कर मुकाडे, वसंता इंगळे, स्वप्निल इंगळे, चिरांगे, कान्हा तिरपण चव्हाण, उमेश पवार, बादल पवार, चंदू पवार, सुषमा चव्हाण, माया पवार, पूनम उमेश पवार, अनिल कुचक्या पवार, आदी उपस्थित होते.