नगरसेवकांचे शोले स्टाईल आंदोलन; नगरपंचायत कार्यालयाला घातला चपलांचा हार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 02:11 PM2023-01-24T14:11:16+5:302023-01-24T14:13:55+5:30
प्रशासनाच्या मनमानी कारभाराने संताप
ढाणकी (यवतमाळ) : येथील विकासकामे निवेदन देऊनही सुरू होत नाहीत. प्रशासन सामान्यांच्या कामासाठी आडकाठी धोरण अवलंबते. नगरसेवकांची मुस्कटदाबी करते. घरकुलाचा प्रश्नही अधांतरीच आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी नगरसेवकांनी नगरपंचायत कार्यालयाला चपलांचा हार घालून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.
जनसामान्यांचे प्रश्न सुटत नसल्याने प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून नगरसेवकांनी प्रथम नगरपंचायत कार्यालयाला चपलांचा हार घातला. नंतर पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. भाजप गटनेते संतोष पुरी, उमेश योगेवार, साईनाथ मंतेवाड, पंकज केशवाड यांनी आंदोलनात सहभाग घेतला. तीन वर्षांपासून शहरामध्ये केवळ विकासकामे होत असल्याचा आव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
पाणीप्रश्न अद्यापही सोडविण्यात यश आले नाही. घरकुलासाठी लागणारी कागदपत्रे नगरपंचायतीकडून मिळत नाहीत. यामुळे आमची आणि जनतेची कुचंबणा होत असल्याचे त्यांनी सांगितले. नगर पंचायतीमध्ये नगरसेवकांचे म्हणणे कोणी ऐकत नाही. तेथे सामान्य माणसाला कशी वागणूक दिली जात असेल, याचा विचार न केलेला बरा. या सर्व बाबीला कंटाळून हेकेखोर नगरपंचायत प्रशासनाविरुद्ध आंदोलन करीत असल्याचे नगरसेवक संतोष पुरी यांनी सांगितले. जोपर्यंत रखडलेली विकासकामे सुरळीतपणे होणार नाही, तोपर्यंत टाकीवरून खाली उतरणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र, वृत्त लिहिस्तोवर मुख्याधिकारी आले नव्हते.