हरियाणातील शूटर, इटालियन कुत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 11:47 PM2018-10-09T23:47:19+5:302018-10-09T23:49:14+5:30
गेल्या २७ दिवसांपासून सातत्याने हुलकावणी देणाऱ्या नरभक्षी वाघिणीला जेरबंद करण्यासाठी अर्जुन अवॉर्डप्राप्त प्रसिद्ध गोल्फपटू तथा शूटर ज्योतींदरसिंग रंधवा हा दोन प्रशिक्षित ईटालियन श्वानासह राळेगावच्या जंगलात दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : गेल्या २७ दिवसांपासून सातत्याने हुलकावणी देणाऱ्या नरभक्षी वाघिणीला जेरबंद करण्यासाठी अर्जुन अवॉर्डप्राप्त प्रसिद्ध गोल्फपटू तथा शूटर ज्योतींदरसिंग रंधवा हा दोन प्रशिक्षित ईटालियन श्वानासह राळेगावच्या जंगलात दाखल झाला आहे. हत्तीच्या धुमाकूळानंतर थांबविण्यात आलेल्या मोहिमेला पुन्हा एकदा गती देण्यात आली असून हवेत उडणाऱ्या दोन आसनी पॉवर पॅरामोटरिंग या यंत्राची देखील या मोहिमेत मदत घेतली जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी परत गेलेला हैैद्राबाद येथील वादग्रस्त शूटर नवाब शाफत अली खान हादेखील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा या मोहिमेत सहभागी झाला आहे. त्याच्याच माध्यमातून गोल्फपटू ज्योतींदरसिंग रंधवा याला त्याच्या दोन ईटलियन श्वानांसह राळेगावच्या जंगलात पाचारण करण्यात आल्याची माहिती पांढरकवडाच्या उपवनसंरक्षक के.एस.अभर्णा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. रंधवासोबत केन कोर्सो जातीचे दोन प्रशिक्षित कुत्रे असून कार्लोस आणि बस्टर अशी त्यांची नावे आहेत. याशिवाय पॉवर पॅरामोटरिंग हे अत्याधुनिक हवेत उडणारं यंत्रदेखील दाखल झाले आहे. पाच हजार फूट उंच उडणाºया या ग्लायडरमध्ये दोन व्यक्ती बसून वाघिणीचा शोध घेणार आहेत.
गेल्या २७ दिवसांपासून वाघिण व तिचे दोन बछडे वनविभागाच्या पथकाला हुलकावणी देत आहेत. अशात मिशन टी-वन कॅप्चर मोहिमेतून पाच हत्ती माघारी गेल्याने वनविभागाने पुन्हा शूटर नवाबला पाचारण केले. त्यानंतर नवाब आपल्या पथकासह राळेगावच्या जंगलात दाखल झाला. शूटर नवाब गेल्या चार दिवसांपासूनपरिसराची टेहळणी करीत आहे.
माजी मंत्री ‘पीसीसीएफ’ला भेटले
यवतमाळ - वाघिणीची राळेगाव-पांढरकवडा तालुक्यात असलेल्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या नेतृत्वात राळेगावच्या काही गावकऱ्यांनी मंगळवारी प्रधान मुख्य वनसंरक्षक यु.के. मिश्रा (वन्यजीव) यांची येथे भेट घेतली. यावेळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, सीसीएफ राहूरकरहेसुद्धा उपस्थित होते. १३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या वाघिणीचा अद्याप बंदोबस्त न झाल्याने काय परिणाम होत आहे, याचा पाढाच प्रा. पुरकेंनी वाचला. वाघिणीच्या भीतीमुळे शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, गुरेढोरे चारण्यासाठी जाऊ नये, असे वन विभागाचे आदेश आहे. म्हणून वन विभागाने गुराढोरांच्या चाऱ्याची व्यवस्था करून द्यावी, वाघिणीला पकडण्यासाठी आणलेला हत्ती सुटून एका महिलेचा बळी गेला. वृद्ध, जखमी झाला, अनेकांचे नुकसान झाले, या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, आठ शिकारी झाल्यानंतर वन विभागाने वाघिणीचा विषय गांभीर्याने घेतला. त्यासाठी एवढा विलंब लावणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. यावेळी अरविंद वाढोणकर, अरविंद फुटाणे, जितेंद्रसिंग कोंघारेकर उपस्थित होते.