वाढदिवसाच्या पार्टीत हवेत गोळीबार, पोलिसांनी पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 04:03 PM2023-11-29T16:03:16+5:302023-11-29T16:04:00+5:30
वणीच्या भांदेवाडा मार्गावरील शेतातील घटना
वणी (यवतमाळ) : परिसरात कुख्यात गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. अशातच सोमवारी रात्री वणी तालुक्यातील राजूर-भांदेवाडा मार्गावरील शेतात सुरू असलेल्या वाढदिवसाच्या पार्टीत एका कुख्यात आरोपीने अग्नीशस्त्रातून हवेत दोन फायर केले. या घटनेची माहिती मिळताच, वणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाठलाग करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
उमेश किशोरचंद राय (३४) असे आरोपीचे नाव असून तो प्रगतीनगर कोलारपिंपरी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून विदेशी बनावटीची ७.५ लिहिलेली एक रिव्हाॅल्व्हर जप्त केली आहे. सोमवारी, २७ नोव्हेंबरला उमेश राय याचा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त त्याने राजूर-भांदेवाडा मार्गावरील कश्यप नामक व्यक्तीच्या शेतात पार्टीचे आयोजन केले होते.
शेतात डीजे लावून नाचगाणे सुरू होते. वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी याबाबतच्या कारवाईबाबत वणीचे ठाणेदार अजित जाधव यांना निर्देश दिले. मंगळवारी पहाटे २:३० वाजता ठाणेदार अजित जाधव यांनी सहायक पोलिस निरीक्षक दत्ता पेेंडकर व पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन घटनास्थळाकडे धाव घेतली. भांदेवाडा मार्गावरील स्मशानभूमीजवळील कश्यप यांच्या शेतात पोलिसांचा ताफा पोहोचताच, पोलिसांना बघून दारू पिऊन नाचणारे अनेक लोक तिथून पळून गेले. आरोपी उमेश राय हा पोलिसांना पाहून पळून जात असताना पळता-पळता जमिनीवर पडला. पाठलाग करीत असलेल्या पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन शेतातील घराजवळ लाइटच्या उजेडात आणले.
पंचासमक्ष आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेवर लटकलेली विदेशी बनावटीची रिव्हाॅल्व्हर पोलिसांनी मिळाली. सोबतच वाढदिवस पार्टी करीत असताना त्याच अग्निशस्त्रातून दोन राउंड हवाई फायर केल्याची कबुली त्याने पोलिसांपुढे दिली. पोलिसांनी काडतुसाचे २ रिकामे कव्हरही जप्त केले. आरोपीकडून पोलिसांनी एक सॅमसंग कंपनीचा मोबाइल (किमत ४० हजार रुपये) जप्त केला. याप्रकरणी सहायक फाैजदार सुदर्शन देवराव वानोळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी उमेश किशोरचंद राय याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३,७,२५,२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
उमेश राय सराईत गुन्हेगार
अग्निशस्त्रातून गोळीबार केल्याप्रकरणी वणी पोलिसांनी अटक केलेला आरोपी उमेश किशोरचंद राय हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार आहे. यापूर्वी त्याच्याविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात खून, अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. तो मागील एक वर्षापूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून कारागृहातून बाहेर आला होता. तो अग्निशस्त्र घेऊन वावरत असल्याची टीप पोलिसांना यापूर्वीच मिळाली होती. तेव्हापासून वणी पोलिसदेखील त्याच्या मागावर होते. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता.