पोलीस संरक्षणात तूर खरेदी
By admin | Published: April 23, 2017 02:26 AM2017-04-23T02:26:26+5:302017-04-23T02:26:26+5:30
शासकीय तूर खरेदीच्या शेवटच्या दिवशी शनिवारी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना चक्क
४० हजार क्विंटलची मोजणीच नाही : टोकनवरील सव्वातीन लाख तुरीचे काय?
यवतमाळ : शासकीय तूर खरेदीच्या शेवटच्या दिवशी शनिवारी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना चक्क पोलीस संरक्षणात तूर खरेदी करावी लागली. तरीही ४० हजार क्विंटल तूर खरेदी होऊ शकली नाही. आता खरेदी बंद झाल्याने हजारो शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. सव्वा तीन लाख क्विंटलची शेतकऱ्यांनी टोकनव्दारे नोंदणी केली होती. त्या तुरीचे आता काय होणार, असा प्रश्न आहे.
शासकीय तूर खरेदी केंद्र असलेल्या बाजार समित्यांमध्ये अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात तुरीची आवक झाली. शुक्रवारी रात्रीपासूनच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केंद्रावर तूर विक्रीसाठी आणली. परिणामी या केंद्रावरील गर्दी अवाक्याबाहेर गेली होती. अशी स्थिती उद्भवण्याची शक्यता गृहित धरूनच जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच बाजार समित्यांना पोलीस संरक्षण मागण्याचे निर्देश दिले होते. तसेच त्यांनी स्थिती स्फोटक होण्याचा धोकाही हेरला होता. त्यानुसार बाजार समित्यांनी गर्दी हाताळण्यासाठी शेवटच्या दिवशी पोलिसांना पाचारण केले.
जिल्ह्यात शनिवारी सर्वच बाजार समित्यांमध्ये चक्क पोलीस संरक्षणात तुरीचे मोजमाप करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत तूर खरेदी सुरू होती. तरीही दिवसाअखेर जिल्ह्यातील ४० हजार क्विंटल तुरीचे मोजमाप झालेच नाही. ही तूर अद्यापही या केंद्रावर उघड्यावर पडून आहे. आता ती खरेदी केली जाईल किंवा नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सव्वा तीन लाख क्विंटल तुरीची नोंद टोकनावर करण्यात आली आहे. त्यांचे मोजमापही बाकी आहे. या समस्येवर चर्चा करण्यासाठी रविवार, २३ एप्रिलला यवतमाळात सर्व बाजार समितींच्या सभापतींची तातडीची बैठक होत आहे.
जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनचे ११ केंद्र आहे. विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन व एफसीआयचे प्रत्येकी दोन, असे एकूण १५ केंद्र सुरू करण्यात आले होते. या सर्व केंद्रांना २२ एप्रिलपर्यंत तूर खरेदीचे आदेश होते. त्यामुळे या सर्व केंद्रांवर अखेरच्या दिवशी तुफान गर्दी झाली होती. राळेगाव व आर्णी येथील केंद्रांवर अखेरच्या दिवशीही खरेदी झाली नाही. यामुळे तेथील शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. यवतमाळ केंद्रावर अखेरच्या दिवशी सर्वाधिक गर्दी होती. येथे पोलीस उपनिरीक्षक योगेश हिवशे यांच्या नेतृत्वातील पोलीस पथकाच्या बंदोबस्तात दुपारी खरेदी सुरू झाली. यात मोजक्याच शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली. इतर शेतकऱ्यांवर आता खुल्या बाजार मातीमोल भावाने तूर विकण्याची वेळ ओढवली आहे. बाजारात व्यापाऱ्यांनी दर पाडले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी तूर उत्पादकांची स्थिती जाणून घेण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रांना तत्काळ अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहे. त्यांनी किती तूर खरेदी झाली, किती तूर बाकी आहे, याचा अहवाल मागितला. (शहर वार्ताहर)
चाळणी अन् काट्यांची ओढाओढ
निदान अखेरच्या दिवशी आपल्या तुरीची खरेदी व्हावी म्हणून यवतमाळ केंद्रांवर शेतकऱ्यांची चाळणी आणि काट्यांची ओढाओढ सुरू होती. अनेकांचा तास न् तास प्रतीक्षा करूनही नंबर लागत नसल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागत होती. अशात लगतच्या तुरीची मोजणी होताच काही शेतकरी काटे आणि चाळण्या आपल्याकडे ओढून मोजणीची मागणी करीत होते.
२१ कोटींचे चुकारे रखडले
नाफेडने आत्तापर्यंत एक लाख २० हजार ५८७ क्विंटल तूर खरेदी केली. त्यापोटी ६० कोटी ८९ लाख ६५ हजार १२ रूपयांचा चुकारा अदा करावा लागणार आहे. मात्र त्यातील ४६ कोटी ५४ लाख ८८ हजार ५९८ रूपयांचे चुकारेच आत्तापर्यंत अदा झाले आहे. अद्याप १४ कोटी ३४ लाख ७७ हजाराचे चुकारे थांबले आहे. व्हीसीएमएसने २५ कोटी ७१ लाख ९७ हजारांची ५० हजार २३० क्विंटल तूर खरेदी केली. यापैकी १८ कोटी २९ लाख रूपयांचे चुकारे अदा झाले. अद्याप ७ कोटींचे चुकारे बाकी आहे.