कोविड रुग्णालयात औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 05:00 AM2021-03-08T05:00:00+5:302021-03-07T23:30:01+5:30
कोरोना उपचारात रामबाण समजल्या जाणाऱ्या रेमडिसीवर इंजेक्शनचा पुरवठा बंद झाला. आरोग्य यंत्रणेची दाणादाण उडत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला राज्यात येथील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून मे २०२० पर्यंत कोरोनाचा एकही मृत्यू होऊ दिला नाही. रुग्णसंख्या वाढत गेली, तसे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. आता तर दिवसाला तीन ते चार जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाची लाट जिल्ह्यात आली आहे. रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात गंभीर ते अतिगंभीर असलेले रुग्ण मोठ्या संख्येत शासकीय कोविड रुग्णालयात दाखल होत आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेचे नियोजन कोलमडले आहे. शासकीय कोविड रुग्णालयात २७६ कोरोनाग्रस्त उपचार घेत आहेत. यातील १२३ जण गंभीर ते अतिगंभीर लक्षणे असलेले आहेत. कोरोना उपचारात रामबाण समजल्या जाणाऱ्या रेमडिसीवर इंजेक्शनचा पुरवठा बंद झाला. आरोग्य यंत्रणेची दाणादाण उडत आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला राज्यात येथील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून मे २०२० पर्यंत कोरोनाचा एकही मृत्यू होऊ दिला नाही. रुग्णसंख्या वाढत गेली, तसे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. आता तर दिवसाला तीन ते चार जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. याची कारणे वेगवेगळी असली तरी आरोग्य यंत्रणेवर वाढलेला ताण व अपुरी औषधी हेही प्रमुख कारण मानले जात आहे. रेमडिसीवर या इंजेक्शनचे सहा डोस एका कोरोनाग्रस्ताला द्यावे लागतात. याप्रमाणे शासकीय रुग्णालयात दिवसाला ७० रेमडिसीवर इंजेक्शनची गरज लागते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुरवठा बंद केल्याने रेमडिसीवर इंजेक्शन मिळविताना रुग्णालय प्रशासनाची कसरत होत आहे. यापूर्वीच कोविड रुग्णालयाला आपत्ती व्यवस्थापन निधीतून पाच कोटी मिळावेत, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, तो प्रस्ताव शासन स्तरावरच आहे. त्यामुळे अनेकांची देयकेही रखडली आहेत. कोविड रुग्णालयाचा कारभार उधारीवर किती दिवस चालवायचा, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना वाढत असताना औषधांचा तुटवडा घातक ठरत आहे. कोविड रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर, नर्सेस जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. मात्र, त्यांना रुग्णांच्या उपचारासाठी पर्याप्त औषधी नसल्याने अडचणी येत आहेत. दिवसाला ७०पेक्षा अधिक रेमडिसीवर इंजेक्शनची जुळवाजुळव करताना कसरत होत आहे. डोस पूर्ण झाले नाही तर रुग्णांचाही रोष ओढावला जाईल, अशी भीती येथील डॉक्टरांना आहे. प्रशासनाकडून मात्र कुठल्याच ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.
नोडल अधिकाऱ्यांनी केले हात वर
प्रत्येक जिल्ह्यात कोरोना प्रतिबंध व उपाययोजनांचा नोडल अधिकारी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सकांची नियुक्ती केली आहे. यवतमाळातील कोविड रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीनस्त असले तरी नोडल अधिकारी म्हणून तेथील औषधी व इतर सुविधांची देखरेख करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांवर येते. कोरोनाच्या काळात जिल्हा आरोग्य अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या दोन्ही यंत्रणेत समन्वय ठेवण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांवर आहे. रेमडिसीवरच्या तुटवड्याबाबत नोडल अधिकाऱ्याने हात वर केले आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
संसर्गाचे प्रमाण व लक्षणे ठरतात निर्णायक
उपचार करताना कोरोना रुग्णांची तीन गटात विभागाणी केली जाते. मध्य, गंभीर व अतिगंभीर असे हे गट आहे. ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आहेत, परंतु त्याचे संसर्गाचे प्रमाण आठ पेक्षा कमी आहे, अशांना रेमडिसीवीर इंजेक्शन लावले जात नाही. मात्र ज्यांच्यामध्ये लक्षणे आहेत, सोबतच त्यांना रक्तदाब, मधुमेह असे आजार आहे, अशा रुग्णांना रेमडिसीवीरची गरज भासते. तेव्हा संसर्गाचे प्रमाण फारसे लक्षात घेतले जात नाही.