मंदिरे उघडायला हवीत काय, कोणत्या पक्षाला काय वाटते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:00 AM2021-09-02T05:00:00+5:302021-09-02T05:00:22+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने जीवित हानी झाली. त्यामुळे कोरोनाचा कहर अनुभवलेल्या प्रत्येकाने आता दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे यवतमाळ शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट झालेली आहे. अशीच परिस्थिती राज्यभरात आहे. मात्र, त्याचवेळी केरळ राज्यात स्थानिक सणांमुळे कोरोना रुग्णांची चिंताजनक वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही राज्य शासन विशेष दक्षता घेत आहे.
विशाल सोनटक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रुग्णसंख्या घटलेली असली तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट कायम आहे. अशा स्थितीत मंदिरे उघडायला हवीत काय, हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरत आहे. शासकीय बैठका, बाजारपेठेसह हॉटेल, मंगल कार्यालये सुरू असताना केवळ मंदिरात गेल्यानेच कोरोना होतो, असा शोध आघाडी सरकारने कुठून लावला, असा प्रश्न भाजपकडून उपस्थित केला जात आहे. तर हे तर केंद्र शासनाने दिलेले निर्देश असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने जीवित हानी झाली. त्यामुळे कोरोनाचा कहर अनुभवलेल्या प्रत्येकाने आता दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे यवतमाळ शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट झालेली आहे. अशीच परिस्थिती राज्यभरात आहे. मात्र, त्याचवेळी केरळ राज्यात स्थानिक सणांमुळे कोरोना रुग्णांची चिंताजनक वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही राज्य शासन विशेष दक्षता घेत आहे. मात्र, ही काळजी घेतानाच बाजारपेठेसह अनेक आस्थापना सुरू असताना केवळ धार्मिक स्थळांवर निर्बंध का, असा कळीचा मुद्दा आता उपस्थित केला जात आहे.
सध्या श्रावण महिना सुरू आहे. या महिन्यात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र, कोरोना निर्बंधामुळे श्रावणातही भाविकांना मंदिरात जाता येत नाही. पर्यायाने या धार्मिक स्थळांच्या माध्यमातून होणारी कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली असून, अनेकांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच मंदिरासह सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. तर धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देश केंद्रानेच दिलेले आहेत. कोरोनाची संभाव्य लाट येण्याची शक्यता असल्याने राज्य शासन केंद्राच्या निर्देशानुसार याबाबतची कार्यवाही करीत नसल्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार सर्वांनीच अनुभवला आहे. कोरोनामुळे अनेकांचे जीव गेले असून, उपचारानंतर बरे झालेले अनेकजण अन्य व्याधींचा आजही सामना करीत आहेत. त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता केंद्रानेच नियुक्त केलेल्या टास्क फोर्सने वर्तविल्यानंतर धार्मिक स्थळांच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी केंद्र शासनाने त्यावरील निर्बंध कायम ठेवले आहेत. तिरुपतीसह देशभरातील प्रमुख मंदिरे बंद असताना केवळ राजकीय हेतूने आघाडी शासनावर आरोप करणे चुकीचे आहे. येणारे दिवाळी-दसऱ्यासारखे मोठे सण पाहता दक्षता घ्यायलाच हवी.
- पराग पिंगळे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना
मंदिर केवळ श्रद्धेचा किंवा आस्थेचा विषय नाही, तर लाखो लोकांच्या उपजीविकेचेही ते साधन आहे. श्रावणासारख्या महिन्यात याठिकाणी होणाऱ्या उलाढालीतून मंदिर व्यवस्थापन वर्षभराचे आर्थिक नियोजन करते. मात्र, आता ही व्यवस्थाच आघाडी शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे ढासळली आहे. शासकीय बैठकांसह बाजारपेठा, मंगल कार्यालये तुडुंब असताना केवळ मंदिरांवरच निर्बंध का, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. सरकारने निर्णय न घेतल्यास भाजप पदाधिकारी मंदिरे उघडण्यासाठी पुढाकार घेतील.
- नितीन भुतडा, जिल्हाध्यक्ष, भाजप
देवाचे स्थान हृदयात आहे. त्यामुळे काही कालावधीसाठी मंदिरात जाता आले नाही तरी वाईट वाटून घ्यायला नको. कुटुंबाच्या, समाजाच्या भल्यासाठीच शासनाने निर्बंध घातलेले आहेत. कोरोना महामारीमुळे होणारे नुकसान सर्वांनी अनुभवलेले आहे. पुन्हा ती वेळ येऊ नये, यासाठी काही दिवसांसाठी निर्बंध लागू असल्यास त्याचे पालन करायला हवे. हे सर्वांच्याच हिताचे आहे.
- चंदू चौधरी, शहराध्यक्ष, काँग्रेस