गोपनीय दौऱ्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांची झाडाझडती, ग्रामसेवकाला शो-कॉज नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 06:51 PM2021-02-17T18:51:04+5:302021-02-17T18:51:33+5:30

उमरखेडमध्ये घेराव : हिवराच्या ग्रामसेवकाला शो-कॉज

Show-cause notice to Gram Sevak in umarkhed | गोपनीय दौऱ्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांची झाडाझडती, ग्रामसेवकाला शो-कॉज नोटीस

गोपनीय दौऱ्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांची झाडाझडती, ग्रामसेवकाला शो-कॉज नोटीस

Next

यवतमाळ : विधीमंडळाच्या पंचायतराज समितीने बुधवारी पाच वेगवेगळ्या गटात जिल्ह्यातील पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी आदींना भेटी देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. उमरखेड येथे उमेदच्या महिलांनी समिती सदस्यांना घेराव घातला तर महागाव तालुक्यातील हिवरासंगमच्या ग्रामसेवकाला समितीने शो-कॉज नोटीस बजावली. 

आमदार संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वातील एकूण १५ सदस्यांची पंचायतराज समिती मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाली. या समितीने मंगळवारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सीईओंची साक्ष नोंदविली. त्यानंतर बुधवारी समितीने पाच वेगवेगळे गट करून विविध पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळा, अंगणवाडींना भेटी दिल्या. वणी, आर्णी, मारेगाव, नेर, कळंब, घाटंजी, उमरखेड, महागाव, दारव्हा, पांढरकवडा आदी पंचायत समितींना भेटीदेऊन एकूण कामकाजाचा आढावा घेतला. उमरखेड येथे समिती सदस्य आमदार कैलास पाटील, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार मेघना बोर्डीकर यांंना घेराव घालून उमेदकडून ना उमेद झालेल्या महिलांनी निवेदन दिले. महागाव तालुक्यात हिवरासंगम येथील ग्रामसेवकाला समाधानकारण उत्तरे देता आली नाही. त्यामुळे समितीने त्यांना शो-कॉज नोटीस बजावली. महागावच्या पंचायत समिती सभागृहात शिक्षण विभागाची कानउघाडणी केली. विविध बाबींचे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. 

कळंब पंचायत समितीत समितीने शिक्षण विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले. यवतमाळ लगतच्या लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेलाही समितीने भेट दिली. समितीच्या आगमनामुळे यंत्रणेत धडकी भरली होती. ठिकठिकाणी सदस्यांच्या स्वागतासाठी सरबराई करण्यात आली. बाभूळगाव येथे ११ ग्रामसेवकांकडून झालेल्या अपहार प्रकरणात काय कारवाई करण्यात आली, यावर अधिकाऱ्यांना जाब विचारला. नेरमध्ये गोपनीय चर्चा होऊन समिती निघून गेली. 

गोपनीय दौरा झाला उघड
समितीच्या पाच पथकांनी मंगळवारी रात्री दौऱ्याचे गोपनीयरीत्या नियोजन केले होते. मात्र रात्रीच हा दौरा फुटला. त्यामुळे कोणते पथक कुठे येणार आहे, याची चाहूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागली हेाती. त्यानुसार बुधवारी संबंधितांनी समिती सदस्यांच्या सरबराईत कुचराई हेाऊ नये म्हणून दक्षता घेतली. सोशल मीडियावर सातत्याने समिती आता येथून निघाली, या मार्गाने गेली, येथे भेट देणार आहे, असे मॅसेज दिवसभर फिरत होते. यात शिक्षक सर्वाधिक उत्सुक दिसून आले.

 

Web Title: Show-cause notice to Gram Sevak in umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.