श्रावणबाळ ! कुणीही या, अनुदान घ्या!
By admin | Published: November 18, 2015 02:37 AM2015-11-18T02:37:40+5:302015-11-18T02:37:40+5:30
निराधारांना आधार मिळावा म्हणून शासनाने सुरू केलेल्या श्रावणबाळ योजनेत आर्णी तालुक्यात कुणीही यावे आणि अनुदान घेऊन जावे, असा प्रकार सुरू आहे.
यवतमाळ : निराधारांना आधार मिळावा म्हणून शासनाने सुरू केलेल्या श्रावणबाळ योजनेत आर्णी तालुक्यात कुणीही यावे आणि अनुदान घेऊन जावे, असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अपात्र लाभार्थी शासकीय निधी लाटत असून तब्बल साडेचार हजार लाभार्थ्यांची कागदपत्रेच प्रशासनाकडे उपलब्ध नाही. मात्र, या साडेचार हजार लोकांना श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळत आहे.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आयुष्यच्या उत्तरार्धात आधार मिळावा म्हणून श्रावणबाळ योजना राबविली जाते. तालुकास्तरावर नेमल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजना समितीकडून पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाते. मात्र, आर्णी तालुक्याच्या समितीने अनेक अपात्र लाभार्थ्यांची निवड केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर विभागीय आयुक्तांनी नोंदविलेले निरीक्षण गंभीर आहे. आर्णी तालुक्यात श्रावणबाळ योजनेत ७ हजार ४८५ लाभार्थ्यांना दर महिन्याला अनुदान दिले जात आहे. मात्र, यातील तब्बल ४ हजार ५५४ लाभार्थ्यांची प्रकरणेच तहसील कार्यालयात उपलब्ध नाहीत. केवळ २ हजार ९३१ प्रकरणे उपलब्ध आहेत. मात्र साडेहजार लाभार्थ्यांची कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे सांगणारे प्रशासन या लाभार्थ्यांना अनुदान वितरित करीत आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या पात्रतेबाबत संशय निर्माण झाला आहे. त्यामुळेच संजय गांधी निराधार योजना विभागाकडे आर्णी तहसीलदारांचे दुर्लक्ष असल्याचे विभागीय आयुक्तांनी नमूद केले आहे. आर्णी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष ज्या शेंदूरसनी गावातील आहेत, त्याच गावातील लाभार्थ्यांबाबत गावकऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे. येथील पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्रांना लाभ दिल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. समितीची २० आॅगस्ट २०१४ रोजी झालेली बैठकही संशयाच्या भोवऱ्यात आहे. या बैठकीत मंजुरीसाठी श्रावणबाळ योजनेची ४१२ प्रकरणे आली. मात्र, बैठकीत मंजूर यादीतील लाभार्थ्यांची संख्या ४२३ आहे. काही लाभार्थी समितीने मनमानी पद्धतीने यादीत घुसडल्याची शक्यता आहे. बैठकीच्या इतिवृत्त लिहिताना मंजूर आणि नामंजूर अर्जांच्या संख्येचा रकाना कोरा ठेवण्यात आला. बैठकीनंतर लाभार्थ्यांची यादी मनमानीपणे फिरविण्यासाठी वाव असावा म्हणूनच हा खटाटोप करण्यात आल्याचा आरोप होत आहे. अनेक लाभार्थ्यांचे वय अधिक दाखविण्यात आले, शेती असलेल्यांनाही योजनेचा लाभ देण्यात आला, काही जणांचे उत्पन्नाचे दाखले संशयास्पद आहे. आणी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष शेंदूरसनीचे आहेत. याच गावातील रमाकांत कोल्हे यांनी माहिती अधिकारातून पात्र-अपात्र लाभार्थ्यांची माहिती उघड केली आहे. तर रमाकांत कोल्हे आणि कुणाल आठवले यांनी या प्रकरणातील सत्य शोधण्यासाठी पाठपुरावा चालविला आहे. मात्र, वर्ष उलटूनही त्यांना दाद मिळत नाही. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतरही आर्णी तहसीलकडून चौकशी करण्यात आलेली नाही. (स्थानिक प्रतिनिधी)