श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 09:49 PM2018-07-03T21:49:03+5:302018-07-03T21:52:34+5:30
ट्रॅक्टर चोरी गेल्याची माहिती उशिरा दिल्याचे कारण पुढे करत विमा दावा नाकारणाऱ्या श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला ग्राहक न्यायालयाने दंड ठोठावला आहे. बाभूळगाव तालुक्याच्या नायगाव येथील धीरज उत्तमराव भितकर यांनी दाखल केलेल्या तक्रारप्रकरणात हा निर्णय देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ट्रॅक्टर चोरी गेल्याची माहिती उशिरा दिल्याचे कारण पुढे करत विमा दावा नाकारणाऱ्या श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला ग्राहक न्यायालयाने दंड ठोठावला आहे. बाभूळगाव तालुक्याच्या नायगाव येथील धीरज उत्तमराव भितकर यांनी दाखल केलेल्या तक्रारप्रकरणात हा निर्णय देण्यात आला आहे.
धीरज भितकर यांच्या ट्रॅक्टरचा विमा काढण्यात आला होता. ट्रॅक्टर चोरी गेल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली. यानंतर विमा कंपनीकडे क्लेम मागितला. मात्र देण्यास टाळाटाळ सुरू झाली. त्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. तक्रारीवर युक्तिवादादरम्यान विमा कंपनीने आपल्याकडे तक्रार उशिरा आल्याची बाजू मांडली. मात्र वाहन चोरी गेल्यास पोलिसांकडूनच आधी शोध घेण्याचा सल्ला दिला जातो. हीच बाब भितकर यांच्याविषयी घडली. त्यांची तक्रार सात दिवसानंतर नोंदवून घेतली. तेथून दोन दिवसानंतर विमा कंपनीला माहिती दिली. पॉलिसीच्या अटीचे उल्लंघन करण्यात आले असे सांगत भितकर यांना क्लेम नाकारला होता.
विमा कंपनीने हलगर्जीपणा व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याच्या निर्णयाप्रत मंच पोहोचले. कंपनीने भितकर यांना विमा दाव्याची रक्कम रुपये दोन लाख सव्याज द्यावी, शारीरिक व मानसिक त्रासापोटी २० हजार आणि तक्रार खर्चाचे पाच हजार रुपये द्यावे, असा आदेश दिला.
यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष रवींद्र नगरे, सदस्य अॅड. आश्लेषा दिघाडे व रमेशबाबू सिलिवेरी यांनी हा निर्णय दिला आहे.