भोंगे बंद, भेटीगाठींवर जोर
By admin | Published: February 15, 2017 02:44 AM2017-02-15T02:44:15+5:302017-02-15T02:44:15+5:30
१६ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी जाहीर प्रचाराच्या तोफा मंगळवारी थंडावल्या.
प्रचार तोफा थंडावल्या : शिवसेना, कॉग्रेस, भाजपा, राष्ट्रवादीत रस्सीखेच
यवतमाळ : १६ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी जाहीर प्रचाराच्या तोफा मंगळवारी थंडावल्या. उमेदवारांचा भर आता छुप्या प्रचारावर राहणार आहे.
जिल्हा परिषदेचे ५५ गट आणि पंचायत समितीच्या ११० गणांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. या निवडणुकीसाठी गेली आठवडाभर ग्रामीण भागात प्रचाराचा प्रचंड गाजावाजा सुरू होता. जाहीर सभा, कॉर्नर सभा, पथनाट्ये, रॅली, लाऊड स्पिकरद्वारे वाहनातून धावता प्रचार सुरु होता. परंतु मंगळवारी रात्री १० वाजता प्रचाराच्या या तोफा थंडावल्या. आता मतदानासाठी बुधवार हा एकच दिवस बाकी असल्याने उमेदवारांचा जोर भेटीगाठींवर राहणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीची ही निवडणूक सत्ताधारी भाजपा व शिवसेनेने अधिक प्रतिष्ठेची केली आहे. हे दोनही पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. दोनही पक्षाकडे लालदिवे अर्थात राज्यमंत्रीपद असल्याने या निवडणुकीला आणखीच महत्व प्राप्त झाले आहे. निवडणूक निकालानंतर नेमक्या कुणाच्या दिव्याचा प्रकाश अधिक, हे स्पष्ट होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेत सत्ता मिळवायचीच, असा निर्धार भाजपा व शिवसेनेच्या या नेत्यांनी केला आहे. ग्रामीण भागातील एकूणच मतदारांचा सूर पाहता कोणत्या पक्षाला बहुमत मिळते, हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे. ‘सिंगल लार्जेस्ट पार्टी’ होण्यासाठी राजकीय पक्षांची धडपड सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्रीपद काढून घेऊन भाजपाने शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना जणू सूड भावनेने उतरली आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपा नकोच, अन्य कुणीही चालतील, असा त्यांचा छुपा अजेंडा असल्याचा सूर शिवसैनिकांमधून ऐकायला मिळतो आहे.
गेली कित्येक दशके जिल्हा परिषदेच्या सत्तेची धुरा सांभाळणारा काँग्रेस पक्षही आपला नंबर वन कायम ठेवण्यासाठी धडपडतो आहे. काँग्रेसचे सर्व नेते-पदाधिकारी गटबाजी विसरुन आपआपल्या मतदारसंघात ‘बिझी’ आहेत. मात्र काही ठिकाणी अद्यापही गटबाजीचे दर्शन होताना दिसते आहे.
आपल्या विधानसभा मतदारसंघातील अधिकाधिक जागा मिळवून आपले वर्चस्व काँग्रेसच्या ‘लालदिव्याला’ पुन्हा एकदा दाखवून देण्यासाठी नेते मंडळी कामाला लागली आहे. काही जागांसाठी सत्ताधारी व विरोधी बाकावरील पक्षांनी ‘क्रॉस कनेक्शन’ लावल्याची चर्चाही ऐकायला मिळते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही पुसद विभागासोबतच आर्णी, दारव्हा, पांढरकवडा अशा काही तालुक्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. याशिवाय बसपा, एमआयएम, मनसे व काही अपक्ष उमेदवारही आपल्या परीने जोर लावून आहेत. जिल्हा परिषदेच्या नव्या आखाड्यात बहुतांश नवखे सदस्य राहतील, एवढे मात्र निश्चित. (जिल्हा प्रतिनिधी)
एसपी नाईट पेट्रोलिंगसाठी रस्त्यावर
४निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानेही सर्व प्रमुख मार्गांवर जिल्हाभर नाकाबंदी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार हे स्वत: सोमवारी रात्री १० पासून मंगळवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात नाईट पेट्रोलिंगसाठी रस्त्यावर उतरले होते. मतदान व मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रयत्नरत आहे.