‘सीओं’ना अंधारात ठेऊन लावले दिवे
By admin | Published: July 2, 2017 01:37 AM2017-07-02T01:37:06+5:302017-07-02T01:37:06+5:30
येथील नगरपरिषदेच्या विद्युत पर्यवेक्षकाला मुख्याधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
पुसद नगरपरिषद : परस्पर कारभार करणाऱ्या विद्युत पर्यवेक्षकाला नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : येथील नगरपरिषदेच्या विद्युत पर्यवेक्षकाला मुख्याधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शहरात अतिखर्चिक फोकस दिवे लावल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुसद नगरपरिषदेच्या २९ वॉर्डांपैकी जवळपास निम्या वॉर्डांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. नगरसेवकांना आपल्या वॉर्डातील समस्यांकडे लक्ष देण्यास सवड नाही. पदाधिकाऱ्यांनाही शहरातील समस्यांशी काहीच घेणेदेणे नाही. त्यामुळे पुसदकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पालिकेत काही महिला पदाधिकाऱ्यांचे पतीराज हस्तक्षेप करीत असल्याने प्रशासनातही अनागोंदी निर्माण झाली आहे. शासनाने उदात्त हेतूने स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण दिले. महिलांचे सक्षमीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी उचललेले हे पाऊल आत्मघाती ठरत असल्याचे अनेक प्रकारांवरून दिसून येत आहे.
येथील नगरपरिषदेत महिलाराज आहे. मात्र काही महिला पदाधिकारी स्वत: समोर न येता त्यांचे पतीराजच त्यांच्या विभागाचा गाडा हाकत असल्याचे दिसून येत आहे. यात विद्युत विभाग आघाडीवर आहे. विद्युत सभापतींचे पतीराजच या विभागाच्या कामकाजात ढवळाढवळ करीत असल्याचे सांगितले जाते. विद्युत सभापती क्वचितच नगरपरिषद कार्यालयात येतात. मात्र त्यांचे पतीराज स्वत: त्यांच्या खुर्चीवर बसून कर्मचाऱ्यांना आदेश देत असल्याचे सांगितले जाते. शहरातील अनेक वॉर्डात पथदिवे बंद आहे. नवीन पथदिवे बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, विद्युत सभापतींचे पतीराज निविदा निघायच्या आहे, निधी नाही असे कारण सांगून नागरिकांची बोळवण करीत आहे. दुसरीकडे शहरात काही ठिकाणी अतिखर्चिक फोकस पथदिवे भाड्याने लावण्याचे काम वरिष्ठांच्या परवानगीशिवाय करण्यात आले. याबाबत वरिष्ठांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. या कामाचे देयक कोणत्या निधीतून अदा करायचे किंवा आपण आपले वेतनातून देयक अदा करणार का, याबाबतचे लेखी स्पष्टीकरण आता मुख्याधिकाऱ्यांनी वीज विभागाच्या पर्यवेक्षकाला मागितले आहे. संबंधित पर्यवेक्षकाला त्यांचे कृत्य बेजबाबदारपणाचे असून शिस्तभंग करणारे असल्यामुळे आपल्याविरुद्ध नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी विद्युत पर्यवेक्षकाला शो-कॉज नोटीस बजावल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सदर पर्यवेक्षकाने मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय परस्परच कारभार केल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पतीराजांच्या अवाजवी हस्तक्षेपाची ओरड
नगरपरिषदेच्या काही महिला पदाधिकाऱ्यांचे पतीराज पालिकेच्या कामकाजात अवाजवी हस्तक्षेप करीत असल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. दहा वर्षांपूर्वी तत्कालिन नगराध्यक्षांचे पती पहिल्या बैठकीच्या वेळी सभागृहाबाहेर खिडकीतून कामकाजाची पाहणी करीत होते. त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधित पतीराजांना नगरपरिषदेच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये, अशी तंबी दिली होती. त्यानंतर तत्कालीन नगराध्यक्षांच्या पतीराजांनी नगरपरिषदेत पायही ठेवला नाही. तीच पद्धत विद्यमान नगराध्यक्षांच्या कार्यकाळात सुरू आहे. मात्र, इतर महिला पदाधिकाऱ्यांच्या पतीराजांना नगरपरिषदेच्या कामकाजात हस्तक्षेप न करण्याची ताकीद देण्याची गरज आहे. नगराध्यक्षांनी संबंधित महिला पदाधिकाऱ्यांच्या पतीराजांना ताकीद द्यावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.