कर्मचाऱ्यांना जीवदानाचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 05:00 AM2020-09-29T05:00:00+5:302020-09-29T05:00:17+5:30
कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी बदली प्रक्रिया लांबली होती. त्यानंतर ग्रामविकास विभागाने बदल्या करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात प्रत्येकी ७.५ टक्के प्रशासकीय व विनंती बदल्यांचा समावेश होता. सामान्य बदल्यानंतर जिल्हा परिषदेने एकाच विभागात पाच वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या लिपीक व लेखावर्गीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या विभाग बदल्यांची प्रक्रिया पार पाडली. मात्र अद्याप अनेक कर्मचारी जुन्याच विभागात कार्यरत आहे. आता अशा कर्मचाऱ्यांना जीवदान मिळण्याचे संकेत प्राप्त होत आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी बदली प्रक्रिया लांबली होती. त्यानंतर ग्रामविकास विभागाने बदल्या करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात प्रत्येकी ७.५ टक्के प्रशासकीय व विनंती बदल्यांचा समावेश होता. सामान्य बदल्यानंतर जिल्हा परिषदेने एकाच विभागात पाच वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या लिपीक व लेखावर्गीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात सामान्य प्रशासन, बांधकाम, सिंचन, वित्त, शिक्षण, पाणीपुरवठा, समाजकल्याण आदी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बदली प्रक्रियेनंतर ३० ऑगस्टपर्यंत सर्व बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र संबंधित विभाग प्रमुखांनी अशा कर्मचाऱ्यांना अद्यापही कार्यमुक्त केले नाही. अनेक कर्मचारी आपल्या जुन्याच विभागात कार्यरत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी ७ सप्टेंबरला सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेतला. त्या बैठकीत बहुतांश विभाग प्रमुखांनी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना आपल्याच विभागात कार्यरत ठेवण्याची मागणी केली. त्यावरून सीईओंनी संबंधित विभाग प्रमुखांना तसा प्रस्ताव तातडीने सादर करण्याची सूचना दिली. त्यानुसार विभाग प्रमुखांनी आता संबंधित कर्मचाऱ्यांना आपल्याच विभागात कार्यरत ठेवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची धावपळ सुरू केली आहे. तथापि तब्बल १५ दिवस उलटून गेल्यानंतरही प्रस्ताव दाखल झाले नसल्याची माहिती आहे. आता ३0 सप्टेंबरपर्यंत तरी विभाग प्रमुख प्रस्ताव सादर करतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्मचाऱ्यांना नवीन विभागाची अॅलर्जी
पाच वर्षे एकाच विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना बदली झालेल्या नवीन विभागाची अॅलर्जी असल्याचे दिसून येते. संबंधित कर्मचाºयांनी आपापल्या परीने फिल्डींग लावून आपल्या विभाग प्रमुखांकडे त्याच विभागात कायम राहण्यासाठी धडपड चालविली होती. त्यामुळेच विभाग प्रमुखांनी सीईओंसमोर संबंधितांना आपल्या विभागात कायम ठेवण्याची मागणी केली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. परिणामी बदली झालेल्यांना आपल्याच विभागात कायम राहण्याचे जीवदान मिळण्याचे संकेत आहे.
विभाग प्रमुखांना ३० सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर संबंधित कर्मचारी जुन्याच विभागात पुढील काही महिने कार्यरत राहतील.
- डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, यवतमाळ