आठ तालुक्यांमध्ये उलथापालथीचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 05:00 AM2021-12-13T05:00:00+5:302021-12-13T05:00:02+5:30
जिल्हा परिषदेत सध्या ६१ गट आहेत. १६ पंचायत समितींमध्ये १२२ गण आहेत. गेल्या १० वर्षांत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्याला आठ गट आणि १६ गण वाढवून मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात जिल्हा निवडणूक विभागाला सूचना दिल्या आहेत; मात्र नेमके कोणत्या तालुक्यात गट आणि गण वाढणार याबाबत स्पष्ट आदेश अद्यापही आले नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य निवडणूक आयोगाच्या धोरणानुसार नव्याने वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे गण वाढणार आहेत. यात जिल्ह्यात आठ गट आणि १६ गणांची भर पडणार आहे. यामुळे जिल्ह्यातील किमान आठ तालुक्यांमध्ये राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत आहेत.
जिल्हा परिषदेत सध्या ६१ गट आहेत. १६ पंचायत समितींमध्ये १२२ गण आहेत. गेल्या १० वर्षांत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्याला आठ गट आणि १६ गण वाढवून मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात जिल्हा निवडणूक विभागाला सूचना दिल्या आहेत; मात्र नेमके कोणत्या तालुक्यात गट आणि गण वाढणार याबाबत स्पष्ट आदेश अद्यापही आले नाहीत. त्यामुळे गट आणि गण वाढीचा गुंता अद्याप कायम आहे. तथापि, आठ तालुक्यांमध्ये निश्चितच राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
विद्यमान सदस्यांची मुदत येत्या मार्चमध्ये संपणार आहे. तत्पूर्वीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक घोषित होण्याची शक्यता आहे. मात्र गट आणि गणांच्या निर्मितीनंतरच ही निवडणूक होणार आहे. तसेच गट आणि गणांसाठी तत्पूर्वीच आरक्षण काढले जाणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांच्या नजरा नवीन गट व गण निर्मितीकडे लागल्या आहेत. त्यांना आरक्षणाचीही प्रतीक्षा आहे. नवीन गट आणि गण रचण्याची इच्छूकांना उत्सुकता लागली आहे. त्यावरच त्यांचे सर्व राजकीय गणित अवलंबून आहे. विशेषत: संबंधित आठ तालुक्यांमधील इच्छुकांची प्रतीक्षा ताणली जात आहे.
या तालुक्यांमध्ये बिघडणार गणित
जिल्ह्यात पुसद, उमरखेड, महागाव, वणी या तालुक्यांमध्ये सर्वाधिक गट आणि गण आहेत. या तालुक्यांची लोकसंख्याही मोठी आहे. त्यामुळे या चार तालुक्यांमध्ये निश्चितच प्रत्येकी एक गट आणि दोन गण वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय दिग्रस, घाटंजी, झरी, बाभूळगाव आणि यवतमाळ यापैकी चार तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट आणि दोन गण वाढण्याची शक्यता आहे.
जुन्या गट-गणांची मोडतोड
नवीन गट आणि गण निर्मितीसाठी संबंधित तालुक्यात जुन्या गट आणि गणांची मोडतोड होण्याची शक्यता आहे. त्या तालुक्यातील गट आणि गणांची नव्याने निर्मिती होण्याची शक्यता आहे. परिणामी सध्या गट आणि गणात असलेली गावे नवीन गट व गणात जाण्याची शक्यता आहे. संबंधित तालुक्यातील सर्वच गट आणि गणांची मोडतोड होऊन नवीन गट निर्माण होण्याची शक्यता आहे.