६८२ गावात पाणीटंचाईची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 06:00 AM2020-01-16T06:00:00+5:302020-01-16T06:00:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यातील ६८२ गावात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. ही टंचाई निवारण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील ६८२ गावात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. ही टंचाई निवारण्यासाठी नऊ कोटींच्या कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या निधीमधून ७०६ उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.
यावर्षी बरसलेला पाऊस अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. बरसलेला हा पाऊस जमिनीत पाहिजे तसा मुरलाच नाही. परिणामी येत्या उन्हाळ्यात पुन्हा भीषण टंचाई निर्माण होणार आहे.
भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ६८२ गावामध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. याकरिता ७०६ उपाययोजना जिल्हा प्रशासनाला कराव्या लागणार आहे. त्याकरिता नऊ कोटी १२ लाख रूपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात १४ तात्पुरत्या पुरक नळ योजना, २४ नळ योजनांची विशेष दुरूस्ती, ४७५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करावे लागणार आहे. ३६ गावामध्ये टँकर आणि बैलगाडीच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासह विविध उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी हा राखीव निधी खर्ची घातला जाणार आहे. पाणीटंचाईच्या काळात स्थानिक स्तरावरून काही प्रस्ताव आल्यास त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
कोट्यवधीच्या खर्चानंतरही टंचाई
पाणीटंचाईचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघावा म्हणून जलयुक्त शिवार योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून पाटसऱ्या, शेततळे, माथा ते पायथा, बांध बंदिस्ती या सारख्या विविध उपाययोजना करण्यात आल्या. यावर कोट्यवधीचा खर्च झाला. यानंतरही जिल्ह्यात पाणीटंचाई कायमच आहे.