चिलगव्हाणचा चिरेबंदी वाडा नि:शब्द
By admin | Published: March 16, 2017 01:00 AM2017-03-16T01:00:09+5:302017-03-16T01:00:09+5:30
सदैव माणसांचा राबता आणि अगत्यासाठी तत्पर असलेला चिलगव्हाणचा चिरेबंदीवाडा संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येपासून नि:शब्द झाला तो कायमचा.
रविवारी अन्नत्याग : राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येचे भयाण वास्तव
संजय भगत महागाव
सदैव माणसांचा राबता आणि अगत्यासाठी तत्पर असलेला चिलगव्हाणचा चिरेबंदीवाडा संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येपासून नि:शब्द झाला तो कायमचा. तब्बल ३१ वर्षांपूर्वी या वाड्याच्या मालकाने केलेली आत्महत्या राज्यातील पहिली ठरली. रविवारी या वाड्यासमोर काळी रांगोळी काढून अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. परंतु ज्या वाड्यापुढे आंदोलन होणार आहे, त्या कुटुंबाचा कोणीही वारसदार असू नये, हेच या वाड्याचे भयान वास्तव होय.
महागाव तालुक्यातील चिलवाडी येथील साहेबराव करपे या भूमिपुत्राने ३१ वर्षांपूर्वी १९ मार्च रोजी पवनार येथे पत्नी मालता, मुलगा श्रीकांत, मुलगी सारिका, मंगला आणि विश्रांती या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली होती. राज्यातील ही पहिली शेतकरी आत्महत्या ठरली. या शेतकऱ्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शेतकरी नेते अमर हबीब यांच्या नेतृत्वात एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन १९ मार्च रोजी संपूर्ण राज्यात केले जात आहे, तर साहेबराव पाटलांच्या या चिरेबंदीवाड्यापुढेही गावकरी आंदोलन करणार आहे. या अन्नत्याग आंदोलनामुळे साहेबराव पाटलांचा तो चिरेबंदीवाडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
चिलगव्हाण हे पुसद-माहूर रस्त्यावरील गाव. शीप नदीच्या तीरावर वसलेल्या या गावात जमीनदार साहेबराव पाटील यांचा चिरेबंदीवाडा आहे. एकरभर जागेत उभारलेला हा वाडा आजही बुलंद असला तरी त्याचा मालक मात्र आज या जगात नाही. साहेबराव पाटील यांच्याकडे वंशपरंपरागत जमीन होती. शेतीत प्रचंड मेहनत करण्याची त्यांची तयारी होती. साहेबराव १५ वर्षे गावचे अविरोध सरपंच होते. सत्यासाठी झटणारा हा माणूस शेती आणि संगीताचा चाहता होता. काळ्या मातीशी इमान राखून असलेल्या साहेबराव पाटलांनी हिस्से वाटणीनंतर आपल्या वाट्यावर आलेल्या जमिनीत विविध प्रयोग केले. परंतु त्यांना आलेले नैराश्य किती काळोख असू शकते, याची कल्पनाच करवत नाही.
३१ वर्षानंतर चिलगव्हाण येथील जमीनदार असलेल्या कुटुंबाचे आता येथे काहीच अस्तित्व शिल्लक नाही. वाडा विकला गेला. गुंठाभर जमीनही शिल्लक नाही. पाठचा भाऊ तोही गावसोडून इतरत्र वास्तव्याला आहे. आज हा चिरेबंदीवाडा तेवढी पाटील कुटुंबाची साक्ष देते. हा वाडा आता दुसऱ्याच्या मालकीचा असला तरी साहेबरावांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न नवीन मालकानेही केला आहे. चिरेबंदीवाड्यातील प्रत्येक वस्तू साहेबराव पाटलांच्या आठवणीने अश्रू ढाळते. १९ मार्चला पुन्हा या साहेबराव पाटलांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. परंतु त्यावेळी या कुटुंबातील कोणीही नसेल, हे दुर्दैव त्या वाड्याचे की साहेबरावांचे.