नेर येथे मूक मोर्चा, बाजारपेठ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 10:15 PM2018-04-19T22:15:16+5:302018-04-19T22:15:16+5:30
जम्मू काश्मिरातील कठुआ येथे आठ वर्षीय बालिकेवरील अत्याचार आणि उत्तर प्रदेशातील उन्नव येथे महिलांवर झालेला अत्याचार, या घटनांच्या निषेधार्थ नेर येथे मूक मोर्चा काढण्यात आला. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : जम्मू काश्मिरातील कठुआ येथे आठ वर्षीय बालिकेवरील अत्याचार आणि उत्तर प्रदेशातील उन्नव येथे महिलांवर झालेला अत्याचार, या घटनांच्या निषेधार्थ नेर येथे मूक मोर्चा काढण्यात आला. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. मोर्चात सर्वधर्मीय नागरिक आणि सर्वपक्षीयांचा सहभाग होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मूक मोर्चाला सुरुवात झाली. शहराच्या प्रमुख भागातून मार्गक्रमण करीत तहसीलवर धडकला. नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
देशातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये कुठेतरी शासन आरोपींना पाठबळ देत असल्याने नागरिकांमध्ये शासनाच्या विरोधात असंतोष खदखदत आहे. या प्रकाराचा निषेध नोंदवित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. व्यापाऱ्यांनी बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेऊन निषेध नोंदविला.
मोर्चात काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारिप-बहुजन महासंघ, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, शिवसेना, मौलाना आझाद विचार मंच, मराठा सेवा संघ, आत्मभान सामाजिक संघटना, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय मुस्लीम मेहतर भंगी कामगार संघटना, राष्ट्रीय विकास संघटना, बार असोसिएशन, नारीशक्ती संघटना, राष्ट्रीय विकास संघ, राष्ट्रीय विकास संघ आदी संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते.