दिव्यांग चिमुकल्यांच्या मूक संवेदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 06:00 AM2020-01-05T06:00:00+5:302020-01-05T06:00:11+5:30
मुलींच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यासाठी देशात आजवर अनेक आंदोलने झाली. मात्र शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे येथील अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने शुक्रवारी मूकबधीर शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. चिमुकल्यांनी रॅलीत मूक संवेदना व्यक्त केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शहरातून मूक रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी दिव्यांग चिमुकल्यांनी स्त्री शिक्षणाची मुहर्तमेढ रोवणाऱ्या फुले दाम्पत्याला भारतरत्न द्यावा, अशी मूक मागणी केली. यातून त्यांच्या संवेदना दिसून आल्या.
मुलींच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यासाठी देशात आजवर अनेक आंदोलने झाली. मात्र शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे येथील अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने शुक्रवारी मूकबधीर शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. चिमुकल्यांनी रॅलीत मूक संवेदना व्यक्त केल्या. प्रारंभी मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन केले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हा संघटक गणेश राऊत होते.
उदघाटक सुनयना अजात, प्रमुख वक्ते प्रा. प्रवीण बनसोड, प्रमुख पाहुणे वैशाली बनसोड, माळी महासंघाचे डॉ. वसंतराव उमाळे, महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रा. दत्तात्रय राहाणे, नगरसेवक रवी तरटे, अॅड. राजेश चौधरी यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. गणेश राऊत यांनी सामाजिक, राजकीय प्रगतीकरिता संघटनात्मक बांधणीशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन केले. देशात महिलांवरील अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगितले. निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले. विशेष म्हणजे सदर निवेदन बाबासाहेब नाईक मूकबधीर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिले. त्यातून चिमुकल्यांनी मूक संवेदना व्यक्त केल्या.
स्वहस्ताक्षरातील पत्रे पाठविली
अक्षर तपस्वी दिवंगत दि.तु. होले गुरुजी यांच्या प्रेरणेतून मुलींच्या पहिल्या शाळेसाठी राबविलेल्या पत्र चळवळीतून विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहलेली पत्रेही पंतप्रधानांना पाठविण्यात आली. प्रास्ताविक गोपाल पुसदकर, संचालन अंबिका क्षीरसागर, तर आभार राजेंद्र घाटे यांनी मानले.