खोदकामात सापडले चांदीचे शिक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 10:15 PM2018-09-27T22:15:56+5:302018-09-27T22:17:19+5:30
महागाव तालुक्याच्या माळकिन्ही येथे खोदकामात राणीछाप चांदीचे २९३ शिक्के सापडले. पोलिसांनी ते जप्त केले आहे. मात्र या प्रकरणात माळकिन्ही येथे गुप्तधनात तीन ते पाच किलो सोने सापडल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव/गुंज : महागाव तालुक्याच्या माळकिन्ही येथे खोदकामात राणीछाप चांदीचे २९३ शिक्के सापडले. पोलिसांनी ते जप्त केले आहे. मात्र या प्रकरणात माळकिन्ही येथे गुप्तधनात तीन ते पाच किलो सोने सापडल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांनी सोने दडपून केवळ चांदी दाखविल्याचा सूरही जनतेतून ऐकायला मिळतो आहे.
माळकिन्ही येथील दिलीप दुपात्रे यांच्या घरी खोदकाम सुरू असताना तीन दिवसांपूर्वी हे शिक्के आढळून आले. त्याची माहिती गुरुवारी सकाळी पोलिसांना मिळाली. तेथे जप्ती करताना पोलिसांनी केलेली घाई संशयास्पद आहे. एक माजी लोकप्रतिनिधी व येलदरीतील एकाला दिलीपने या प्रकरणाबाबत सर्व प्रथम माहिती दिली होती. मात्र त्यांनीही ती गुप्त ठेवल्याने रहस्य वाढले आहे.
एवढा विलंब का ?
दिलीप यांच्या घरी तीन दिवसांपूर्वी खोदकामात चांदी सापडली. मग त्याची माहिती तत्काळ त्यांनी पोलिसांना का दिली नाही, त्यासाठी एवढा विलंब का?, चर्चा झाल्यानंतर पोलीस ठाणे का गाठले आदी प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान महागाव पोलिसांपुढे आहे.