वटफळीत रौप्य महोत्सवी धम्म परिषद
By admin | Published: February 2, 2017 12:24 AM2017-02-02T00:24:04+5:302017-02-02T00:24:04+5:30
भारतात ग्रामीण भागात एकाच व्यक्तीकडून होणारी रौप्य महोत्सवी धम्म परिषद २ व ३ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील वटफळी येथे होत आहे.
बुद्धांच्या २७ मूर्र्तींचे अनावरण : विविध देशातील भन्तेजींची उपस्थिती
किशोर वंजारी नेर
भारतात ग्रामीण भागात एकाच व्यक्तीकडून होणारी रौप्य महोत्सवी धम्म परिषद २ व ३ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील वटफळी येथे होत आहे. थायलंड, श्रीलंका, भूतान यासह विविध देशातील भदंतजी यांची उपस्थिती या परिषदेत राहणार आहे. देशभरात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे भदंत प्रा.सुमेधबोधी महाथेरो यांना या परिषदेत सन्मानित केले जाणार आहे. त्यांना एक कार भेट देऊन त्यातून मिरवणूक काढली जाणार आहे.
या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भिक्खू संघ बौद्धगयाचे संघनायक भदंत सदानंद महाथेरो राहणार आहे. उद्घाटन भदंत डॉ. पयालिंकारा (चीन) यांच्या हस्ते होणार आहे. भारतात सारनाथनंतर वटफळी येथे भगवान बुद्धांच्या २७ मूर्तीचे अनावरण या परिषदेनिमित्त होणार आहे. सम्राट अशोक, रामजी सुभेदार, भीमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाई, जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांचे पुतळे लक्षवेधी ठरणार आहे.
या ठिकाणी नव्यानेच तयार झालेले भिक्खू निवास, बौद्ध विहार, व्यायाम शाळा, ग्रंथालय परिषदेला येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारे ठरत आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील दोन अशा एकूण ६० जणांना धम्मभूषण पुरस्कार दिले जाणार आहे. या परिषदेच्या आयोजनाची सुरुवात करणारे प्रा. सुमेधबोधी महाथेरो यांचा विशेष सत्कार यावेळी केला जाणार आहे. ध्वजारोहण, व्याख्यान, परिसंवाद आदी कार्यक्रम या परिषदेत होणार आहे.
ऐतिहासिक ठेवा म्हणून ‘मृदगंध निळा मातीचा’ या स्मरणिकेचे प्रकाशन भदंत डॉ. पयालिंकारा यांच्या हस्ते २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. भगवान बुद्धांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवला जाणार आहे. परिषदेसाठी भास्कर चव्हाण, अनिल वाघमारे, सुनील बनसोड, जयकृष्ण बोरकर, धर्मपाल माने आदी पुढाकार घेत आहे.